बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
महात्मा फुले ,राजर्षी शाहू महाराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा वारसा जपत रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून "कमवा व शिका "असा संदेश देऊन आयुष्यभर गोरगरीब वंचित उपेक्षितासाठी शिक्षणाचा प्रकाश देण्याचे कार्य पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा. कुलगुरू, डॉ .ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८व्या जयंती कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी भोसले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य प्रा.डॉ.संजय क्षीरसागर प.पू.श्री.महंत सुंदरगिरी महाराज, श्री सेवागिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अशोक सावंत, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, अॅड. किसन खामकर श्री. संतोष जाधव उर्फ बाळासाहेब जाधव, श्री. विनायकराव काळे , श्री.मोहन जाधव, श्री. संतोष जाधव, श्रीमती डुबल मॅडम, श्री. प्रदीप जाधव इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे आपल्या भाषणात कुलगुरू डॉ.म्हस्के म्हणाले," डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात आजचा विद्यार्थी पारंगत असला पाहिजे पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये प्रयोगशीलता आणि सामाजिक भान असले पाहिजे तसेच दत्त संप्रदाय हा प्रमुख अध्यात्मिक प्रवाह आहे. त्यामध्ये भक्ती, सेवा ,ज्ञान ,समत्व याचा सुसंवाद दिसतो या संप्रदायात प्रत्येकात दैवत पाहण्याची शिकवण दिली जाते. एकूणच सत्यशोधक चळवळीच्या विचाराशी हा संप्रदाय सुसंगत ठरतो. सत्यशोधक समाजाच्या कार्याचा मुख्य उद्देश हा अंधश्रद्धा, जातीभेद, सामाजिक अन्याय त्यांना विरोध करून विज्ञान निष्ठा, मानवतावादी दृष्टिकोन रुजविणे होय. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लोककल्याणाचे कार्य केले. श्रमाला प्रतिष्ठा दिली. "कमवा व शिका" ही योजना सत्यशोधक तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे हे प्रत्यक्ष कृतीतून समाजाला शिकवण दिली. तसेच घटस्थापनेत नवसर्जन, सृजनशीलता व परिवर्तनशीलतेचे प्रतीक असते. त्याचबरोबर घटस्थापना निर्मितीचे विश्लेषण करताना कर्मवीर अण्णांचे शिक्षण म्हणजे समाजासाठी घट एक भक्कम पाय आहे. त्याचे शैक्षणिक कार्य म्हणजे विज्ञान ,तंत्रज्ञान, श्रम, विवेक हा घटस्थापनेचा मूलभूत घटक असल्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी बहुभाषिक ज्ञान संपादन केले पाहिजे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या अभंगातील मानवी मूल्ये याविषयीची माहिती सांगत असताना भविष्यामध्ये जगातील मानव जात टिकली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणामधून प.पू. श्रीमहंत सुंदरगिरी महाराज म्हणाले,"रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी समाजातील गरीब, शेतकरी, वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. आपण त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या विचारानुसार ज्ञान संपादन करून जीवनात नावलौकिक यश मिळवावे हेच या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने यश आहे. असे सांगितले कार्यक्रम प्रसंगी श्री. संतोष जाधव उर्फ बाळासाहेब जाधव यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना याविषयीची माहिती आणि कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच श्री सेवागिरी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. वेदिका लावंड हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सेवागिरी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव येथील मुख्याध्यापक श्री.अशोक सावंत यांनी सांगितला तर प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांचा परिचय व सत्कार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर .पी.भोसले यांनी केला. कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.हनुमंत निमसे आणि इतिहास विषयाचे प्रा. डॉ.किरण कुंभार यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल तसेच प्रा.मारुती वाघ यांच्या" कर्मचक्र" या कादंबरीस महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळामार्फत नवलेखक अनुदान योजने अंतर्गत अनुदान मिळाल्याबद्दल कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी सत्कार केला.तसेच श्री.सेवागिरी विद्यालयातील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश आवळे ,श्री.राहुल गोरे यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील व श्री सेवागिरी विद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी, प्राध्यापक शिक्षकेतर सेवक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin