राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : दिग्रस तालुक्यातील ग्राम सेवानगर येथे संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याबाबत दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये अमोल उत्तम राठोड यांनी तक्रार दाखल केली. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी फक्त ६ तासांत आरोपीला गजाआड करत चोख कामगिरी बजावली.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या देखरेखीत सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे यांनी केला असून गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलीस पथकाने कसून तपास करून आरोपीचा शोध लावला.
झोपडपट्टी परिसरातील शहापुरा दिग्रस येथे राहणारा दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने पकडले. अटक करण्यात आलेला आरोपी गब्बर शाह मजिद शाह (वय ३०, रा. शाहापूरा, दिग्रस) असून, त्याने चौकशीत कबुली दिली की हे कृत्य त्याने आपल्या साथीदार शमी उल्ला शाह (फरार) याच्यासह केले आहे. तसेच यातील आरोपी गब्बर शहा मज्जित शहा याचेवर पोलीस स्टेशन दिग्रस येथे या वर्षातील संभाजीनगर येथे घडलेल्या गुन्ह्या मध्ये सुद्धा तो आरोपी असून त्याचेवर अमरावती जिल्ह्यात तसेच तेलंगणा तसेच आर्णी पोलीस स्टेशन, दारव्हा पोलीस स्टेशन येथे सुद्धा गुन्हे नोंद आहेत.
या धडाकेबाज कारवाईत पोलीस निरीक्षक मुंडे यांच्यासह सपोनी अमोल गुंडे, पोउपनि किशोर मूरकूटे, पोउपनि महेश देशमुख, पो.अं. मिथून जाधव, पो.अं. आदित्य जाधव, पो.अं. संतोष गजभार, पो.अं. संतोष वाघमारे यांचा विशेष सहभाग होता. तसेच दिग्रसचे पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अनिल मदने हे देखील कारवाई दरम्यान उपस्थित होते.
अवघ्या ६ तासांत आरोपीला अटक करून दिग्रस पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि शिताफी यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.





Social Plugin