अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही,तालुक्यातील चार मंडळांपैकी धनगर पिंपरी मंडळाला मदतीच्या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.यावर तातडीने उपाययोजना करून येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपने राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.भाजपचे सरचिटणीस सुनील खांडेकर यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे.
बुधवार,दि.२४ सप्टेंबर २०२५ रोजी कृषी मंत्री भरणे यांनी अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. धाकलगाव येथे त्यांनी बाधित भागातील शेतीची पाहणी केली.यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.याच भेटीदरम्यान,भाजपचे सरचिटणीस सुनील खांडेकर यांनी कृषी मंत्र्यांना निवेदन देऊन धनगर पिंपरी मंडळातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
निवेदनात अतिवृष्टीने या मंडळातील सुमारे १८ गावांना मोठा फटका बसला असून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे म्हटले आहे.या मंडळाला मदतीच्या यादीतून वगळल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे,तातडीने पिकांचे पंचनामे करून त्यांना अनुदान देण्यात यावे.तसेच,शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
याचबरोबर,पीक पाहणी ॲप व्यवस्थित काम करत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे,अशा शेतकऱ्यांचाही पंचनाम्यात समावेश करून त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.सध्या शेतकरी मोठ्या निराशेच्या गर्तेत असून त्यांना तात्काळ मदतीची गरज असल्याचे खांडेकर यांनी यावेळी म्हटले.





Social Plugin