परतुर तालुका प्रतिनिधी:-लक्ष्मण बिल्हारे
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे गेल्या अकरा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषण स्थळाला आज, 27 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेचार वाजता राज्य सरकारच्या वतीने एक उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट दिली. हे उपोषण स्थळ, जे अंबड चौफुली परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारक स्थळी आहे, धनगर समाजाच्या स्वाभिमानाचे आणि हक्काचे प्रतीक बनले आहे. शिष्टमंडळात जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढाण, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश राठोड, जालना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने बोऱ्हाडे यांच्या तब्येतीची आणि मागण्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या भेटीदरम्यान पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, सरकार धनगर समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे आणि या मागण्या संविधानाच्या चौकटीत बसवून सोडवल्या जातील. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच मार्ग काढला जाईल, असा शब्द देण्यात आला.
विशेष बाब म्हणजे, आज सायंकाळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मोबाईलवर दीपक बोऱ्हाडे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी धनगर आरक्षणाच्या विषयावर चर्चेनंतर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आणि तसे लेखी पत्र देण्याचा शब्द दिला. हे आश्वासन धनगर समाजाच्या लढ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. टीव्ही चॅनेल्सच्या लाईव्ह प्रसारणानुसार, सन्माननीय मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दीपक बोऱ्हाडे यांची दूरध्वनीद्वारे सुमारे दहा मिनिटे चर्चा घडवून आणली. मंत्री महाजन यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत बोऱ्हाडे यांच्या मागण्या मंजूर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दूरध्वनीद्वारे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोऱ्हाडे यांना मुंबई मंत्रालयात तातडीने याबाबत बैठक आयोजित करण्याची घोषणा केली आणि या बैठकीसाठी येण्याचे आमंत्रण दिले. या भेटीनंतर बोऱ्हाडे यांनी उपोषण मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आणि मुंबईतील बैठकीचे आमंत्रण यामुळे धनगर समाजात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या लढ्यात धनगर समाज एकजुटीने पुढे असून, 24 सप्टेंबरला जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या इशारा मोर्चानंतर आता हा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.





Social Plugin