पुसेगावात अधिकारी व विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील डी. एन. जाधव फाउंडेशनने कार्पोरेट दर्जाची श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले आहे. येथून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन खटाव आणि माण तालुक्यातील अधिकाऱ्यांचा टक्का आणखी वाढवतील असा विश्वास पुणे विभागाचे माजी आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केला.पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या अधिकारी व विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, केंद्रीय महसूल विभागाचे उपायुक्त नासिर मणेर, आयएएस दिलीपराव जगदाळे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव वैभव राजेघाटगे, धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप, ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, फाउंडेशनचे चेअरमन माजी कामगार आयुक्त सुरेश जाधव, ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, कार्यकारी समितीचे सदस्य राजेश देशमुख, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. दळवी म्हणाले, स्पर्धा परीक्षांमधून करिअरच्या विविध वाटा फुटतात. पण याविषयी अनेक विद्यार्थ्यांना पुरेशी माहितीच नसते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी खटाव आणि माण तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले पाहिजे. जेणेकरून करिअरविषयीच्या माहितीत भर पडून आपल्या भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढेल. आणि अधिकाधिक अधिकारी घडून खटाव-माणचा डंका देशात वाजेल.नासिर मणेर म्हणाले, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लोकसेवा आयोगाचीच पोस्ट काढण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. कारण उच्चतम परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होऊन जीवनाच्या स्पर्धा परीक्षेत यश निश्चित मिळते.दिलीपराव जगदाळे, वैभव राजेघाटगे, नवनाथ जगताप, अविनाश फडतरे यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश कसे मिळवावे, या परीक्षांची तयारी नेमकी कधी आणि कशी करावी? तसेच स्वतःचे अनुभव याबद्दल मार्गदर्शन केले.सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. श्रीधर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. राजेश देशमुख यांनी आभार मानले.





Social Plugin