Ticker

6/recent/ticker-posts

सीईओंच्या एका भेटीने चकाचक अंबड वर्षानुवर्षांची बेशिस्त एका रात्रीत गायब



*अधिकाऱ्यांच्या भेटीचा भाग नसेल तर प्रशासन झोपेत पण भेटीचा वचक आला की गाव चकाचक अशी चर्चा सध्या अंबड शहरासह तालुक्यात रंगली असून या घटनेने संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणेला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

 जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)अंबड पंचायत समितीला भेट देणार असल्याची माहिती मिळताच संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणेत अक्षरशःखळबळ उडाली केवळ अंबड पंचायत समितीच नव्हे तर मार्गालगतच्या ग्रामपंचायती,जिल्हा परिषद शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्यांमध्येही एका रात्रीत स्वच्छता मोहीमेचा महापूर आला.

ग्रामस्थांच्या तक्रारींना नेहमीचा प्रतिसाद मिळत नसे पण सीईओंच्या एका भेटीच्या धास्तीने सगळे चित्रच पालटले.आरोग्य केंद्रांतील अस्वच्छता गायब झाली शाळांचे वर्ग स्वच्छ झाले आणि ग्रामपंचायतींचे परिसर नव्याने झळकू लागले. ग्रामस्थांनी या झपाट्याने झालेल्या बदलाचे कौतुक करत हे रोजचं दृश्य असावंअशी अपेक्षा व्यक्त केली. 

कार्यालयातही शिस्तबद्ध क्रांती अंबड पंचायत समिती कार्यालयातील नेहमीचा गोंधळ आणि बेशिस्त वातावरण एका रात्रीत संपुष्टात आले. पार्किंग व्यवस्थेत सुधारणा झाली जिथे पूर्वी वाहनांचा गोंधळ असे तिथे आता शिस्त दिसू लागली.अधिकारी-कर्मचारी गळ्यात ओळखपत्र लावून वेळेवर कामावर हजर राहू लागले  प्रशासनात शिस्तीची झलक प्रथमच जाणवली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वचकामुळेच यंत्रणा हलते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.मात्र ही शिस्त केवळ भेटीपुरती‌ राहणार का की ती कायमस्वरूपी रुजवली जाणार हा मोठा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.अधिकाऱ्यांच्या भेटीचा धाक नसेल तर प्रशासन झोपेत पण भेटीचा वचक आला की गाव चकाचक अशी चर्चा सध्या अंबड तालुक्यात रंगली असून या घटनेने संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणेला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.