प्रतिनिधी सोमनाथ काळे
पुण्याच्या बालेवाडीत 'सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी', ह्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बालवडकर दाम्पत्याकडून आयोजित 'दिवाळी सरंजाम वाटप' कार्यक्रमात उपस्थित राहिलो व पुणेकरांशी संवाद साधला.
पुणे शहराचे माजी महापौर अंकुश काकडे, प्रशांत जगताप, रवींद्र चौधरी, संदीप बालवडकर, सुषमा बालवडकर, जयेश मुरकुटे, बाबासाहेब भांडे, ज्योती तांदळे आणि व्यासपीठावरील अन्य सगळे सहकारी आणि बंधू- भगिनींनो..
आज दिवाळी तोंडावर आहे. हा दिवाळीचा प्रत्येकाच्या कुटुंबातला हा सण अत्यंत मोलाचा सण आहे. तो सण सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा. याच्यामध्ये काही संकटं येऊन गेली. मध्यंतरी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः मराठवाडा मग उस्मानाबाद असेल, बीड असेल, जालना असेल, नांदेड असेल, परभणी असेल, सोलापूर असेल. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. जमिनी वाहून गेल्या, पिकं वाहून गेली, गुरंढोरं गेली आणि आमचा त्या भागातला भाऊबंध हा उघडा पडला. त्याची दिवाळी कशी जाईल? याची चिंता सगळ्यांच्या मनामध्ये होती. ती चिंता दूर करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हा विचार संदीप बालवडकर यांनी घेतला आणि त्यांनी ठरवलं की, या भागाचं वैशिष्ट्य मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यातले, अनेक गावचे नागरिक आज या ठिकाणी राहतात. त्या सगळ्यांना दिवाळीला बोलवू. त्यांची दिवाळी गोड कशी होईल? याची काळजी घेऊ. त्यामुळे हा भव्य आणि दिव्य असा मेळावा संदीप बालवडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज आयोजित केला. मी त्यांना धन्यवाद देतो की, आपला सण हा एकतेचा आहे. आपले भाऊबंध, आजूबाजूचे सहकारी त्यांचंही सण व्यवस्थित जावा याची नोंद संदीपने घेतली त्यामुळे प्रचंड असा हा कार्यक्रम आयोजित केला. मी संदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की, ही भूमिका तुम्ही स्वीकारली.
हा सगळा भाग बदलतोय. मला आठवतंय या भागामध्ये मी पूर्वी अनेकदा आलो. त्यावेळेला इथे काय होतं? इथे फक्त शेती होती. मी या भागामध्ये कधीकाळी आलो आणि त्या वेळेला इथे शिवारात कधी ऊस, कधी ज्वारी, कधी अन्य पिकं या ठिकाणी घेतलेली मी पाहिली होती. एक गोष्ट माझ्या लक्षात कायमची राहणारी आहे की, मी मुख्यमंत्री असताना देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरसिंह राव होते, त्यांनी बोलावलेली होती. त्या बैठकीमध्ये चर्चा झाली की, एका वर्षाच्या आत आपल्याला राष्ट्रीय खेळांचे सामने एका राज्यात आयोजित करायचे आहेत. सामने आयोजित करणे म्हणजे आपण कबड्डी किंवा खो-खो असे नसतात. त्याला स्टेडियम लागतात, त्याला सुविधा लागते, निवासाची व्यवस्था करावी लागते. काही हजार खेळाडू देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. ही सगळी व्यवस्था फक्त एका वर्षाच्या आत करायची ही गोष्ट सोपी नव्हती. प्रधानमंत्र्यांनी विचारलं कोण याची जबाबदारी घ्यायला तयार आहे? कुणी बोललं नाही. मी हात वर केला आणि सांगितलं की, "ही जबाबदारी महाराष्ट्र घेईल" आणि महाराष्ट्र घेईल ही सूचना केल्यानंतर ती मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये स्वीकारली गेली. सरळ दिल्लीवरून मी इथे आलो, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कुठे जमीन मिळेल? याची माहिती घेतली. त्याची माहिती घेतल्यानंतर याच भागात प्रमुख लोकांनी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली. अक्षरशः १५ दिवसांत आम्ही कामाची सुरुवात केली. मला आठवतंय की, एका वर्षाच्या आत हजारो खेळाडू देशाच्या कानाकोपऱ्यातून येणार. त्यांचा महाराष्ट्रात सन्मान होईल, याची काळजी घेणं प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने हे आव्हान आपण स्वीकारायचं. मला सांगायला आनंद होतोय की, इथे आल्यानंतर इथल्या स्थानिक जनतेने, शेतकऱ्यांनी तुम्हाला हवी तेवढी जमीन इथे घ्या हे सांगितलं. ती जमीन मिळाली चांगल्या आर्किटेक्टची मदत घेतली आणि स्टेडियमचं बांधकाम या ठिकाणी सुरू झालं. अतिशय थोड्या दिवसात हे स्टेडियम झालं, स्विमिंग पूल, निवासाची व्यवस्था आणि अन्य व्यवस्था झाली. आपण देशाचे प्रधानमंत्री नरसिंहराव यांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांना दाखवलं की, एका वर्षाच्या आत काही हजार खेळाडूंची व्यवस्था करण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या जनतेत आहे. ते या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये करून दाखवलेलं होतं. त्यामुळे या भागाचं नाव देश पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं. अनेक खेळाडूंनी खेळाची चमक या ठिकाणी दाखवली. ज्याची नोंद भारत आणि भारताच्या बाहेर खेळांच्या बद्दल आस्था असलेल्या लोकांनी केली. हा इतिहास आपण करू शकलो आणि त्याचं महत्त्वाचं कारण की या भागातले मग बालवडकर असतील, चौधरी असतील, मुरकुटे असतील, आणखी कोणी असतील या सगळ्यांनी हातभार लावला. त्यामुळेच हा इतिहास आज आपण या ठिकाणी करू शकलो.
आज एका वेगळ्या स्थितीतून आपण जात आहोत. मराठवाड्यातील जिल्हे संकटात आहेत. अतिवृष्टीने घरं-दारं गेली, भिंती पडल्या, मुलांच्या शिक्षणाची स्थिती गंभीर झाली. हे संकट पहिल्यांदा आलं नाही. या भागामध्ये भूकंपाचं संकट एकदा आलं होतं. त्या काळामध्ये ८० हजार घरं ही पडली, ८ हजार लोक मृत्युमुखी पडले होते. हे भूकंपाचं संकट किल्लारीला असेल, उमरदराला असेल, लातूरला असेल, बीडला असेल किंवा त्या वेळच्या उस्मानाबादला असेल हे मोठं संकट आपल्या सगळ्यांचे परीक्षण करणारे होते. पण एका दृष्टीने आपण त्या संकटाला सामोरे गेलो. त्या ठिकाणी एका वर्षाच्या आत ८० हजार घरं बांधण्याच्या संबंधीचा विक्रम आपण लोकांनी केला आणि भूकंपातून लोकांची सुटका केली. हे घडू शकतं लोक एकत्र असले तर आणि आज अनेक भागामध्ये संकट असेल, अतिवृष्टी असेल. पण ही एकी करुन पुन्हा एकदा या संकटग्रस्त माणसांना दिलासा द्यायचा, ही भूमिका संदीप बालवडकर आणि त्यांच्या मित्रांनी आपल्या शिरावर घेतली व तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ द्यायची तयारी दाखवली. त्याच्यासाठी उद्याची तुमची दिवाळी गोड जावी, या हेतूनेच हा प्रचंड सोहळा आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. त्याला मी धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. याच्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दिवाळीचा गोडवा हा चाखायला मिळेल, पाहायला मिळेल याची खात्री या ठिकाणी बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!





Social Plugin