*# दीपोत्सव परंपरेचा तिसरा वर्ष#*
देगलूर -: दिवाळीनिमित्त देगलूर तालुक्यातील येरगी येथे काल दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त चालुक्य कालीन सरस्वती मंदिर,शिवमंदिर,हनुमान मंदिर, सोमलिंग मंदिर, व बारव व परिसरात गावातील सर्व महिला - पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत हजारों दिवे लावून दिवाळी साजरी केली. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाले होते.तर दीपोत्सवानंतर संगीत साधना मंच देगलूर प्रस्तुत भक्तिगीतांचा भव्य कार्यक्रमात बासरी,हार्मोनियम आणि तबलांच्या सुरात येरगी न्हाऊन निघाली. आदर्श व्यक्तिमत्व संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून ग्राम पंचायत कडून दीपावली निमित्त सर्व गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी,गावच्या विकासासाठी हा दीपोत्सव मागील दोन वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे. यावेळी सर्वांनी गावाच्या सुखसमृद्धी साठी देवाची प्रार्थना केली. तसेच यावर्षीं पहिल्यांदच दीपोत्सवानिमित्त भक्तिगीत व भावगीतांची मेजवानी येरगी ग्रामवासियाना मिळाली.
देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन येरगी गावच्या इतिहासात मागील वर्षापासून सामूहिक दीपावली साजरी करत आहेत.यात गावातील सर्व महिला- पुरुष,दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या नवविवाहित महिला उत्साहात सहभागी होतात.
विशेषतः महिलांनी मातीचे दिवे आणि गव्हाच्या पिठापासून दिवे बनवून आणले होते. प्रत्येक महिलांनी जवळपास 101 दिवे आणले होते. अशा हजारो दिव्यांनी गावातील सरस्वती मंदिर, मारुती मंदिर, चालुक्य कालीन शिवमंदिर, सोमलिंग मंदिर, बारव परिसर लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते. या विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे गावातील ज्येष्ठांनी भावोद्गार काढले.आणि ग्राम पंचायत कडून आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. या दीपोत्सवात गावातील सर्व कुटुंबातील सदस्य सामील झाले होते.
दीपोत्सवानंतर संगीत साधना मंच देगलूर प्रस्तुत भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
यानंतर प्रसिद्ध बासरीवादक यांच्या बासरीवादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. शिवानंद स्वामी यांनी जय जय ही भगवती सूर भारती या सरस्वतीच्या आराधनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर प्रसिद्ध गायक बाळासाहेब पाटील यांनी माझे माहेर पंढरी सह अनेक भक्ती गीतांचे प्रस्तुतीकरण केले.संगीत साधना मंच चे अध्यक्ष लक्ष्मण अमृतवार,बालाजी सुगावकर,गोविंद सुवर्णकार,संजय मोतेवार,शीतलकुमार कुलकर्णी,बालाजी ग्रंथमवार, सोमेश मदनूरकर यांनी एकापेक्षा एक भक्तिगीत व भावगीत सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले.या संगीत समारोहात बासरीची साथ एन्नोद्दीन वारसी यांनी,तबल्याची साथ गंगाधर सुगावकर तर हार्मोनियम वर बालाजी सुगावकर यांनी उत्कृष्ट साथ दिली. पोलिस कर्मचारी संभाजी पाटील, श्रीमती शांता तेलंग, विवेक ईश्वरे, धनाजी सांवत मेजर, यांनी बंदोबस्त ठेवला होता.
या दीपोत्सवात आयोजक संतोष पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, सर्व ज्येष्ठ नागरिक,आजी माजी सरपंच, पदाधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, दक्षता समिती, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, सर्व, गावकरी, बालिका पंचायत राज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, संतोष पाटील मित्र मंडळ आदींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला





Social Plugin