अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड मध्ये विविध शॉर्ट टर्म कोर्सेस ची सुरुवात पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंगळवार ८ ऑक्टोबर २०२५ रोजी‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड जि जालना या संस्थेत Certificate course in Solar Panel installation technician,Certificate course in CNG kit fitment technician आणि self employed tailor हे तीन अल्पमुदत अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती प्राचार्य राजेश धानोरकर यांनी दिली. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल माळी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात विश्वकर्मा लाभार्थी संजय सुराशे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आर.जी.डोईजड हे होते.सुदृढ आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी कामगारांना सन्मानाचे स्थान मिळायला हवे,याच संकल्पनेतून स्थानिक आयटीआयच्या या कार्यक्रमात कामगारांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग व्यवस्थापन समित्या (IMC) स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालविणार आहेत.त्यामुळे शिक्षणाचे नियोजन,अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभाग व उत्तरदायित्व वाढणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असून त्यात अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग,ड्रोन तंत्रज्ञान,इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा,सायबर सुरक्षा,इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञ,सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएंसर) इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.महिला उमेदवारांसाठी ३६४ विशेष बॅचेस तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ विशेष बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत.गडचिरोली, लातूर,नागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असून नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन“वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट”हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल.
या अल्पमुदत अभ्यासक्रमांसाठी इच्छुक तरुणांनी अधिक माहितीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य राजेश धानोरकर आणि येथील समन्वयक संतोष दहयाळकर यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.ए.भोजने आणि आभार एल. व्ही.पुपले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी के.के.मगर,एन.बी.चौधरी,आत्माराम कोल्हे,प्रमोद बनसोडे,आर.एन.सावंत,जे.बी.साळुंके,दत्ताभाऊ चौधरी,सतीश भालगावकर,अजय बुंदेलखंडे, योगेश आठवले,एस.एम.मतकर आदींनी परिश्रम घेतले.





Social Plugin