Ticker

6/recent/ticker-posts

अशी माणुसकी असा प्रामाणिकपणा....

           


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे] 

दोन दिवसांपूर्वी दिवाळीचा पाडवा धुमधडाक्यात पुसेगावात साजरा होत होता. सायंकाळी सात वाजत होत्या. अशावेळी देवस्थानच्या मागील बाजूस पार्किंग मध्ये एक मिनी लक्झरी येऊन थांबली. त्यातून पंधरा-वीस महिला उतरल्या आणि मंदिरात दर्शनासाठी गेल्या. दर्शनासाठी जात असताना एका महिलेचा संत सेवा हॉटेल समोर पाच तोळे वजनाचा लक्ष्मी हार पडला. नेमक्या त्याच ठिकाणी प्रदीप देशमुख यांची आठ दहा वर्षाची चिमुरडी नात ओवी... फटाका वाजवण्यासाठी तिथे गेली. तिच्या बाल नजरेत तो दागिना दिसला. आणि तिने तो पटदिशी आणून आपल्या आजीच्या म्हणजेच विद्या प्रदीप देशमुख यांच्या हातात दिला. विद्याताईंनी तो दागिना घरातल्या सगळ्यांना दाखवला. आणि त्या ओवी ला घेऊन तडक मंदिरात गेल्या. 

मंदिरात त्या पर्यटक महिला दर्शन घेऊन बाहेर येत होत्या. विद्याताईंनी प्रत्येक महिलेला विचारायला सुरुवात केली... कोणाचा दागिना पडला आहे का? बऱ्याच बायका नाही ...म्हणून पुढे जात होत्या. सरते शेवटी त्या पुन्हा नाराज होऊन परतल्या. मात्र त्या दागिन्याची किंमत आणि महत्व एका महिलेला माहीत असल्याने त्या मनातून  चडफडत होत्या. त्या हॉटेलच्या बाहेर तिथेच थांबल्या. इतक्यात शेवटच्या दोन बायका त्यांना दिसल्या. विद्याताईंनी त्यातल्या एका आजीला विचारले लक्ष्मी हार कुणाचा पडला आहे का? त्या आजीने स्वतःच्या गळ्याकडे बघितले आणि ती विद्याताईंच्या समोरच चक्कर येऊन पडली. तिथे जमलेल्या सगळ्या महिलांनी त्या बिचारीला तोंडावर पाणी शिंपडून जागे केले. तिला साखर दिली. लिंबू सरबत दिला आणि तिच्या हातात विद्याताईंनी तो दागिना ठेवला. ती आजी विस्तारलेल्या डोळ्यांनी सगळ्या देशमुख परिवाराकडे पाहू लागली. तिला क्षणभर साक्षात सेवागिरी महाराजांची मूर्ती समोर दिसली. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. अगदी सद्गदित होऊन तिने हात जोडले आणि उपकृत झालेल्या नजरेने ती पाहू लागली. असा दागिना मला माझ्या आयुष्यात पुन्हा मिळाला नसता , तुम्ही देव माणसे आहात, सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाशिवाय असे घडू शकत नाही अशा तिने भावना व्यक्त केल्या. सगळ्या महिलांनी मिळून विद्याताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार व्यक्त केले. तिथेच चहा घेतला व चहाचे बिल दोनशे रुपये देण्यासाठी म्हणून पाचशेची नोट प्रदीप देशमुख यांच्या हातात ठेवली. प्रदीप रावांनी दोनशे रुपये घेऊन तीनशे रुपये परत केले. मात्र त्या महिला तीनशे रुपये घेण्यास तयार झाल्या नाहीत. प्रदीप राव व विद्याताईंनी तुम्ही तुमचे तीनशे रुपये माघारी घ्या असा आग्रह धरला. परंतु त्या महिलेने नकार देत तुम्ही हे बक्षीस ठेवा असा अट्टाहास केला. विद्याताईंनी आम्हाला बक्षीस देऊ नका आमच्या नातीने हे पुण्य कर्म केले आहे असे सांगितले. आणि त्या कौटुंबिक गर्दीतून प्रदीप रावांनी ओवीला पुढे घेतले. त्या चिमुरडीच्या हातावर तीनशे रुपये आजीने ठेवले. आणि चमत्कारिक चित्र उभे राहिले. ओवी बाळाला त्या दागिण्यापेक्षा प्रामाणिकपणाचे मिळालेले बक्षीस आभाळापेक्षा मोठे वाटले. 

आणि ती आनंदाने नाचू लागली. त्याचवेळी त्या आजीच्या चेहऱ्यावर पाच तोळ्याचा लक्ष्मी हार मिळाल्याची भावना ओसंडून वाहत होती. ज्यांना ह्या दागिन्याची किंमत सात लाख रुपये असल्याची जाणीव होती त्यांच्या चेहऱ्यावर एका महिलेचा आनंद सोन्यापेक्षा महाग असतो हे लक्षात आले. खरे तर ही घटना, त्याचे बक्षीस, त्याचा गवगवा आणि प्रसिद्धीची कोणतीही अपेक्षा विद्याताई प्रदीप देशमुख यांना नाही. कारण आपले कर्तव्य ज्यावेळी माणूस आपल्या माणुसकीच्या जाणिवेतून पूर्ण करत असतो त्यावेळी त्याला त्याच्या पुण्यकर्माची प्रचिती मनातून मिळत असते. श्रद्धा, सेवा, नम्रता हीच खरी उपासना या सेवागिरी महाराजांच्या शिकवणुकीतून जेव्हा समाज आपले कर्तव्य पार पाडत असतो त्यावेळी त्याच्या जीवनात सर्व काही मिळाल्याची भावना असते. हीच भावना समाजामध्ये वृद्धिंगत व्हावी हीच अपेक्षा व्यक्त करण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने ओवी व परिवाराचा सन्मान करण्यात आला. तिच्या पाठीवर पडलेली शाबासकीची थाप निश्चितपणाने तिचे भविष्य उज्वल करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. ओवी जगताप, विद्या प्रदीप देशमुख, भारती दिलीप देशमुख... आणि या परिवाराचे खूप खूप अभिनंदन.