दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकच उमेदवारी ?
फोटो : महेश शिंदे, जयकुमार गोरे. शशिकांत शिंदे
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ] जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या बुध जिल्हा परिषद गटात अध्यक्षपदासाठी राखीव असलेले नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण पडल्याने आमदार महेश शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस निकराची झुंज पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. तर डिस्कळ आणि बुध हे दोन्ही पंचायत समितीचे गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने इच्छुकांची संख्या वाढणार असून मातब्बरांना आपल्या कुटुंबातील महिलेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ऐनवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढण्याची शक्यता नाकारता येत नाही .
राज्यात राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट पडले असले तरी बुध जिल्हा परिषद गटातील आमदार शशिकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा गटाचे कार्यकर्ते दोन्ही नेते आपलेच असल्याची भूमिका खाजगीत मांडत आहेत. त्यामुळे येथे दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकच उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास कायमच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या या गटात राष्ट्रवादीकडून स्मिता संतोष साळुंखे, सुनीता विजय कचरे , सुजाता रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळू शकते. तर आमदार महेश शिंदे गटाकडून प्रिती विकास त्रिपुटे , मोनिका सागर मदने, पूनम मंदार माळी या नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
बुध गणात राष्ट्रवादीकडून तळागाळातील जनतेशी संपर्क असलेल्या संजय चव्हाण, बाळासाहेब इंगळे, सागर साळुंखे यांच्या कुटुंबातील महिलेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर आमदार महेश शिंदे गटाकडून अभयसिंह राजेघाटगे, महेश पवार, हरी सावंत , कै .सतिश फडतरे, सुरेश चव्हाण यांच्या कुटुंबातील नावे चर्चेत आहेत.
डिस्कळ गणात राष्ट्रवादीकडून डॉ. महेश पवार, प्रदीप गोडसे, कैलास घाडगे, ज्ञानेश्वर जगताप , अरुण वाघ , यांच्या कुटुंबातील महिला उमेदवार असू शकते. तर आमदार महेश शिंदे गटाकडून शिवाजी शेडगे, अमित जगताप, विनोद घाडगे , रोशन घाटगे यांच्या कुटुंबातील नावे आघाडीवर आहेत. या गणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल फडतरे यांच्या विचाराच्या उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही.
तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना मानाजी घाडगे, विठ्ठलराव फडतरे, महेश नलवडे, राजेंद्र घाटगे, पोपट बिटले आदी नेत्यांचे बुध गटावर वर्चस्व राहिले आहे. अजूनही या नेतेमंडळींची बुध जिल्हा परिषद गटावर मजबूत पकड आहे. त्यामुळे ही जुनी काँग्रेस मंडळी स्वतः उमेदवार न देता बेरजेच्या गणितातून एखादे नवे राजकीय समीकरण उदयास आणते का ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
मागील काळापासून या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. बुध जिल्हा परिषद गटातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आमदार महेश शिंदे यांनी संघटनेची ताकद वाढवली आहे. राष्ट्रीय काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेची भुमिका अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे या गटात तुल्यबळ आणि चुरशीच्या लढती पाहावयास मिळणार आहेत. आमदार . महेश शिंदे हे शिवसेना की भाजप कोणत्या पक्षाकडून आपले उमेदवार उभे करतात हे पहावे लागणार आहे तर आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढे दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकरण करण्याचे आव्हान राहणार आहे .आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर बुध जिल्हा परिषद गटातून आमदार महेश शिंदे यांना तोडीस तोड लढत दयावी लागणार आहे . बुध जिल्हा परिषद गटामध्ये बुध , डिस्कळ आणि विसापूर ही मोठी गावे असून उमेदवारीचा समतोल साधण्यासाठी बुध मधून जिल्हा परिषद गटाची उमेदवारी निघाली तर डिस्कळ व विसापूर मधून गणाची उमेदवारी निघण्याची शक्यता नाकारता येत नाही .
चौकट :
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मानणारा मोठा वर्ग बुध जिल्हा परिषद गटात आहे. तसेच या गटातील प्रत्येक गावात त्यांचा तगडा संपर्क आहे. मंत्री झाल्यापासून त्यांनी येथील जुने सहकारी आणि कार्यकर्त्यांना विकास कामांच्या माध्यमातून बळ दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हक्काच्या निर्णायक मतांमुळे श्री. गोरे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. .
डिस्कळ गण : -
मांजरवाडी, मोळ, चिंचणी, काळेवाडी, पांढरवाडी, अनपटवाडी, डिस्कळ, गारवडी, शिंदेवाडी, नवलेवाडी, ललगुण, नागनाथवाडी, पांगरखेल, राजापूर.
बुध गण :-
बुध, काटेवाडी, फडतरवाडी बु.,पवारवाडी, वर्धनगड, नेर, फडतरवाडी नेर, विसापूर, वेटणे, रणसिंगवाडी, कातळगेवाडी.





Social Plugin