Ticker

6/recent/ticker-posts

बदलत्या काळात सोशल मीडियावर दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध व्हावे : चंद्रकांत दळवी .





सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाची उत्साहात सांगता 

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

"अलीकडील काळात पुस्तके खरेदी करून वाचन करण्याचे प्रमाण कुठेतरी कमी होत चालले आहे. असे असले तरी सोशल मिडीयचा वाढता वापर पाहता सोशल मीडियावरील वाचन वाढले आहे. याचा सकारात्मक विचार करता सोशल मीडियावर दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून दिल्यास मराठी भाषा संवर्धनासाठी, साहित्याचा वाचक वर्ग वाढविण्यासाठी त्याचा निश्चित फायदा होईल" असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांनी केले. सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाच्या समारोप समारंभप्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, प्रतापसिंह महाराज यांच्या कार्याचा, शिक्षण तसेच साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना वाचनासाठी, बौद्धिक प्रगल्भतेसाठी रयत शिक्षण संस्थेमार्फत 'रयत' मासिक सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. 

दरवर्षी आयोजित केला जात असलेला हा ग्रंथमहोत्सव पाहण्यासाठी सातारा शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटी आयोजित करून सर्व शालेय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे, विश्वकोषाचे माजी अध्यक्ष प्रा. राजा दीक्षित, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, माजी प्र. कुलगुरू अशोक भोईटे, सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, शिरीष चिटणीस इत्यादी मान्यवर उपस्थित होते.