जालना प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर साळुंके
अंबड : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत . कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. या संदर्भात अंबड येथील महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ( दि.१२) तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सरकारविरोधात लेखनीबंद आंदोलन करत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन दिले . निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा , अव्वल कारकून , मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत निर्णय त्वरित लागू करावा , महसूल विभागासाठी एक परीक्षा पद्धती लागू करावी, अव्वल कारकून यांचे पदनाम सहाय्यक महसूल अधिकारी करावे यासह अनेक मागण्या बाबत निर्णय न झाल्यामुळे दिनांक १० जुलैपासून महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांसह जालना जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी आंदोलनास सुरुवात केली आहे. त्यानुसार बुधवारी दिनांक १० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून काम केले व राज्य शासनाचा निषेध केला तर गुरुवारी ( दि.११ ) जुलै रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शने करण्यात आली , शुक्रवारी ( दि.१२ ) लेखनी बंद आंदोलन करण्यात आले आहे . तसेच 15 जुलै रोजी आयोजित राज्यव्यापी बेमुदत संपात सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले असून शासनाने लवकरात लवकर मागण्या मंजूर कराव्यात या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार विश्वास धर्माधिकारी यांना देण्यात आले . सदर निवेदनावार अव्वल कारकून श्रीमती अनिता मोरे, सुशील जाधव, योगेश वानखेडे, एन.डी.घोरपडे, महसूल सहाय्यक जीवन म्हस्के, श्रीमती टी एस बर्डे , जी.एस.महानूर , ए.पी.शेळके, आर.आर.संत्रे, के.जी.कदम, शिपाई श्रीमती कल्पना कारके यांच्या स्वाक्ष-या आहेत.





Social Plugin