Ticker

6/recent/ticker-posts

माजलगाव तालुक्यातील गावागावांमधून होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहातुन आशेचा नवीन प्रकाश मिळावा!!!!!

 


वैभव सोळंके/माजलगाव


अखंड हरिनाम सप्ताहातून माजलगावला आशेचा नवा प्रकाश मिळावा…

माजलगाव तालुका : माजलगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाला अधिक सर्वसमावेशक आणि वारकरीहित दिशा मिळावी, यासाठी ग्रामस्थांकडून महत्त्वपूर्ण प्रस्ताव उपस्थित करण्यात यावेत, अशी मागणी वारकरी बांधवांनी व्यक्त केली आहे. सप्ताहाची संपूर्ण धुरा सामान्य वारकऱ्यांच्या सहभागातून चालावी, जेणेकरून गावात एकात्मतेची भावना दृढ होईल, असे मत यावेळी व्यक्त झाले.

सप्ताहाच्या आयोजनात वारकरी संप्रदायातील लहान मुलांचा-मुलींचा सहभाग वाढविण्याचा प्रस्तावही पुढे आला. यामुळे भावी पिढीत वारकरी परंपरेबद्दल संस्कार, ओढ आणि भक्ति-भावना निर्माण होण्यास हातभार लागेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यासोबतच गावातील एका सर्वसामान्य वारकऱ्याला वर्षातून कधीही पंढरपूरच्या विठ्ठलपूजेचा मान देण्याचा प्रस्तावही उपस्थित करावा, आणि या पूजेचा सर्व खर्च गावाने उचलावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. यामुळे वारकऱ्याला आयुष्यभराची समाधानाची अनुभूती मिळेल, तर गावकऱ्यांना सेवा-संतोषाची भावना मिळेल, असे मत यावेळी मांडण्यात आले.

किर्तनकार निवडीमध्येही पारदर्शकता राखावी, यावर भर देण्यात यावा. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, गोशाळा, विनामूल्य शैक्षणिक संस्था अशा सेवाभावी उपक्रमात योगदान देणाऱ्या कीर्तनकारांना प्रथम प्राधान्य द्यावे, असा प्रस्ताव उपस्थित करण्यात यावा. कारण सप्ताहासाठीचा निधी हा सामान्य जनतेच्या खिशातून येत असल्याने त्या पैशाचा उपयोग समाजहितासाठी करणाऱ्या कीर्तनकारांनाच मान दिला जावा, अशी भूमिकाही पुढे येत आहे

सप्ताहादरम्यान व वर्षभरासाठी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, भगवद्गीता, तुकाराम गाथा, मृदंग, पेटी आदी साहित्य गावात उपलब्ध करून देण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्तावही मांडण्यात यावा ही सोय केवळ सप्ताहापुरती न राहता, कायमस्वरूपी भक्ति-केंद्र उभारण्याचा प्रस्तावही उपस्थित करावा, अशी मागणी वारकरी बांधवांनकडुन व्यक्त होत आहे.

अखंड हरिनाम सप्ताहातून गावात अध्यात्मिक ऊर्जा, सामाजिक एकात्मता आणि भक्ति-भावनेचा नवा प्रकाश फुलण्यासाठी हे सर्व प्रस्ताव तातडीने अमलात आणावेत, अशी अपेक्षा वारकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे.