Ticker

6/recent/ticker-posts

अटकळीचा अभिमान! गावातील शेख इम्रानची GMC गडचिरोलीमध्ये MBBS ला निवड. शेख इम्रानची उंच भरारी.

 


देगलूर- प्रतिनिधी

अटकळी (ता. बिलोली) : गावाच्या नावाला नवी उंची मिळवत अटकळी गावातील शेख इम्रान शरफोद्दीन यांची गडचिरोली येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC) मध्ये MBBS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेख इम्रान हे अटकळी गावातील सर्वपरिचित शेख कुटुंबातील असून ते स्व. शेख मैनुद्दीन महेताबसाब (गँगमेन) यांचे नातू व शेख शरफोद्दीन यांचे चिरंजीव आहेत. मेहनत, चिकाटी आणि ध्येयासमोर हार न मानण्याची जिद्द यामुळे इम्रान यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवले. इम्रान यांनी शालेय शिक्षण उत्तम गुणांसह पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न लहानपणापासून त्यांच्या मनात होते. ग्रामीण भागात आरोग्य सेवेची कमतरता पाहून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांनी घेतली. अखेर NEET परीक्षेत उत्कृष्ट गुणवत्ता दाखवून GMC गडचिरोली येथील MBBS मध्ये त्यांची निवड झाली. या यशामुळे केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण अटकळी गावाचे नाव गौरवास्पद झाले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, नातेवाईक, शिक्षक व मित्रपरिवार यांच्यासह सर्व स्तरातून इम्रान यांचे अभिनंदन होत आहे. "चिकाटीने अभ्यास केला, शिक्षकांकडून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले, तसेच कुटुंबाचा साथ मिळाल्यामुळे हे यश साध्य झाले," असे इम्रान यांनी यावेळी सांगितले. शेख कुटुंब आणि गावकऱ्यांनी इम्रान यांच्यातून भविष्यात एक सक्षम व सेवाभावी डॉक्टर घडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढे आरोग्य क्षेत्रात समाजासाठी कार्य करण्याची आणि ग्रामीण भागातील लोकांना मदत करण्याची संकल्पना त्यांनी व्यक्त केली. अटकळी गावातून डॉक्टर होण्यासाठीची ही निवड तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली असून गावातील इतर विद्यार्थ्यांमध्येही शैक्षणिक ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास वाढवणारी आहे.