महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाची घोडदौड सुरू असून, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ‘100 पार’चे लक्ष्य गाठण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी गुरव येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, संघटन अधिक मजबूत व्हावे तसेच आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित व्हावा, या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला भाजपचे पदाधिकारी, बूथ स्तरावरील कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार शंकरभाऊ जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, 2017 पासून पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. भाजपच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण, उद्याने, स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे प्रभावीपणे राबविण्यात आली आहेत. या सर्व विकासकामांचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला असून, तोच विश्वास आगामी निवडणुकीत विजयात रूपांतरित करायचा आहे.
“राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातही भाजपने विकासाचा वेग कायम ठेवला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध नियोजन आणि जनतेशी थेट संवाद यावर भर देत काम केले पाहिजे,” असे आवाहन आमदार जगताप भाऊ यांनी केले.
निवडणूक ही केवळ उमेदवारांची नव्हे तर प्रत्येक कार्यकर्त्याची असते. त्यामुळे बूथ स्तरापासून शहर स्तरापर्यंत प्रत्येकाने जबाबदारीने काम करून ‘100 पार’चा संकल्प पूर्ण करावा, असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात रणनीती, संघटन बळकटी, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन तसेच प्रचाराची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागनिहाय नियोजन करून काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.





Social Plugin