गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
नगरपालिकेत राहुल कुल गटाची 'विकेट' शाबूत; १६ जागा जिंकत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांसमोर बहुमताचे आव्हान!
दौंड: दौंड नगरपरिषदेच्या १३ प्रभागांमधील २६ जागांचे निकाल स्पष्ट झाले असून, शहरात सत्ता संतुलनाचे आगळेवेगळे चित्र पाहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दुर्गादेवी जगदाळे यांनी विजय मिळवला असला, तरी प्रभागांच्या लढाईत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील नागरिक हित संरक्षण मंडळाने (भाजप पुरस्कृत) मैदान मारले आहे.दौंडमधील १३ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ उमेदवार याप्रमाणे २६ जागांसाठी मतदान झाले होते.
यामध्ये भाजपने शिस्तबद्ध नियोजन करत १६ जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागांवर यश मिळाले आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने प्रस्थापितांना धक्का दिला आहे.१३ प्रभागांपैकी बहुतांश प्रभागांत भाजपने आपली पकड मजबूत केल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे. विशेषतः काही प्रभागांमध्ये दोन्ही जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. मात्र, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे आता विकासकामांच्या निधीवरून आणि ठरावांवरून नगरपालिकेत 'सत्तासंघर्ष' पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणुका काढल्या, तर नगराध्यक्ष निवडीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार जल्लोष केला.





Social Plugin