Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदन तहसीलदारांच्या केबिनमध्ये पोतराज वेषात प्रवेश; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल.





भोकरदन | प्रतिनिधी : संजीव पाटील

भोकरदन तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या केबिनमध्ये पोतराज वेषात विनापरवानगी प्रवेश करून डफडे वाजवत घोषणाबाजी केल्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात सरपंच मंगेश साबळे यांच्यासह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २२ डिसेंबर रोजी नारायण लोखंडे व विकास जाधव यांनी उपोषण सुरू केले होते. पंचायत समिती व महसूल विभागाशी संबंधित मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून, २६ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता सरपंच मंगेश साबळे यांनी या उपोषणाला भेट दिली.

यावेळी अंगाला पाला बांधून अर्धनग्न अवस्थेत पोतराज वेष धारण करत डफडे वाजवून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या केबिनमध्ये शासकीय कामकाज सुरू असताना विनापरवानगी प्रवेश करून गैरकायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी नायब तहसीलदार अविनाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच मंगेश साबळे, सिरसाठ, रोडे यांच्यासह एकूण बारा जणांविरोधात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, सरपंच मंगेश साबळे यांनी प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींचे मस्टर, झीरो मस्टर, शेतकऱ्यांची प्रलंबित बिले या संदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपण डफली वाजवत आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रशासनाने गरीब शेतकऱ्यांच्या मुलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर डोळ्यांवर काळी पट्टी बांधून, हातात दोर बांधून जेल भरो आंदोलन सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. भोकरदनपासून आंदोलनास सुरुवात झाली असून, प्रशासनाच्या दप्तर दिरंगाई व भ्रष्टाचाराविरोधात हे आंदोलन राज्यभर सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरणार नाही,” असे स्पष्ट मत सरपंच मंगेश साबळे यांनी व्यक्त केले.