Ticker

6/recent/ticker-posts

अंबड तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन पदी नरवडे,व्हाईस चेअरमन भोजणे यांची निवड



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

अंबड तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन पदी श्री.नरवडे किशोर बंडेराव यांची तर व्हाईस चेअरमन पदी श्री.भोजणे भगवान मनाजी यांची आज अधिकृतरीत्या बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून शेतकरी व सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अंबड तालुका खरेदी-विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक आज पार पडली.या बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.त्यानुसार चेअरमन नरवडे किशोर बंडेराव आणि व्हाईस चेअरमन भोजणे भगवान मनाजी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नवनिर्वाचित चेअरमन श्री.नरवडे किशोर बंडेराव हे सहकार क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.तर व्हाईस चेअरमन श्री.भोजणे भगवान मनाजी हे संघटनात्मक कार्यात सक्रिय असून शेतकरी हिताच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

निवडीनंतर बोलताना चेअरमन नरवडे यांनी सांगितले की,“तालुक्यातील शेतकरी,व्यापारी व सभासदांचे हित जपणे,खरेदी-विक्री संघ अधिक सक्षम करणे,पारदर्शक कारभार राबविणे आणि शेतमालाला योग्य दर मिळवून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.”व्हाईस चेअरमन भोजणे यांनीही सर्व संचालक व सभासदांना विश्वासात घेऊन संघाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान,या निवडीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माजी मंत्री राजेश टोपे यांचे अंबड तालुका खरेदी-विक्री संघावरचे वर्चस्व कायम राहिले असून,बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनीही संघाच्या कारभारात प्रभावी सहभाग नोंदविला आहे.विशेष म्हणजे,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे ९ संचालक सदस्य असताना चेअरमन राष्ट्रवादीकडे,तर ८ संचालक सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टीकडे व्हॉइस चेअरमन देण्यात आले आहे.

त्यामुळे अंबड खरेदी-विक्री संघामध्ये “मिळून-मिसळून कारभार” ही नवी राजकीय व सहकारी समीकरणे पाहायला मिळत आहेत.या निवडीबद्दल माजी मंत्री राजेश टोपे व आमदार नारायण कुचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके यांनी नवनिर्वाचित चेअरमन,व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.अंबड तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे ठोस व दूरगामी निर्णय घेतले जातील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.