अंबड प्रतिनिधी,
गणेश सपकाळ
आज दि.१६/१२/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय,वडीगोद्री येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविणेच्या अनुषंगाने वडीगोद्री गावच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये शासनाच्या रस्त्यांबाबतच्या महत्त्वकांक्षी योजनेची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये वडीगोद्री शिवारातील नकाशावरील व वहिवाटीत असलेल्या रस्त्यांचे सीमांकन भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात येणार आहे.सदर रस्त्यांच्या सीमांकनानंतर रस्त्यावरील अतिक्रमण दूर करून सदर रस्त्यांना क्रमांक देण्यात येतील.
त्यानंतर सदर रस्त्यांचे शासनामार्फत मजबुतीकरण करण्यात येणार आहे.सदर योजना संपूर्ण राज्यात पुढील कालावधीमध्ये राबविण्यात येणार असून अंबड तालुक्यामध्ये वडीगोद्री या गावी सदर योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात करण्यात येणार आहे.या योजनेसाठी वडीगोद्री येथील पाऊलवाट,गाडीवाट,पाणंदरस्ते व शिव रस्ते असे एकूण आठ रस्त्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच करण्यात आलेले आहे.
या सर्व रस्त्यांचे सीमांकन दि २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी भूमी अभिलेख विभाग,महसूल विभाग,पोलीस विभाग,ग्राम विकास विभाग यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सदर योजनेमुळे तालुक्यातील प्रत्येक गावच्या रस्त्यांचे मजबुतीकरण होऊन शेतकऱ्यांचे रस्त्याबाबतचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यावत शेती करून बागायती पिकांचे उत्पादन घेण्यास मदत होणार आहे.सदर तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तालुक्याचे आमदार हे असून उपविभागीय अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
सदर बैठक मंडळ अधिकारी वडीगोद्री संदीप नरुटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.सदर बैठकीस ग्राम महसूल अधिकारी वडीगोद्री योगेश गुरव, ग्रामपंचायत वडीगोद्रीचे सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.





Social Plugin