Ticker

6/recent/ticker-posts

मुद्रेगावात वीज पोल कोसळून दोन एकर ऊस जळून खाक



*अतिवृष्टीत वाचवलेल्या पिकावर संकट शेतकऱ्याचे सुमारे ७ लाखांचे नुकसान*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसाबसा वाचवलेला ऊस अखेर वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मुद्रेगाव येथील शेतकरी दिपाली सुदर्शन राऊत यांच्या शेतातून जाणाऱ्या ३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीजवाहिनीचा पोल अचानक कोसळल्याने दोन एकर ऊस पिकाला भीषण आग लागली.

या आगीत शेतकऱ्याचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके संकटात सापडली होती.अशा परिस्थितीत राऊत यांनी मोठ्या कष्टाने,कसोशीने पाणी व्यवस्थापन करत ऊस पिक वाचवले होते.मात्र अचानक वीजेचा खांब थेट उसाच्या शेतात कोसळल्याने उच्चदाब तारेतून ठिणग्या उडाल्या आणि उसाने क्षणार्धात पेट घेतला वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले.

या आगीत दोन एकर ऊस पूर्णतःजळून खाक झाला असून,एक लिंबाचे झाड,११ नग पाईप, ठिबक सिंचन संच तसेच इतर शेती साहित्यही आगीत नष्ट झाले आहे.आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.शेजारील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीने तातडीने मुद्रेगाव परिसरातील वीजपुरवठा बंद केला.स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.मात्र तोपर्यंत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सदर घटनेचा महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात यावा व नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान,वीज पोल कोसळणे,तारा तुटणे अशा घटना तालुक्यात वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे महावितरणने वेळेवर देखभाल-दुरुस्ती करून सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात,अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.