अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड तहसील कार्यालयात आज शुक्रवार रोजी दुपारी शासकीय कामकाजाच्या वादातून धक्कादायक प्रकार घडला.भांबेरी (ता.अंबड) येथील शेतकरी संजय बापूराव कनके यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पवन तुपकर यांच्या कानाखाली लगावल्याची घटना घडली.याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,भांबेरी येथील शेतकरी संजय कनके यांच्या आई ताराबाई कनके यांचे निधन झाले असून त्यांच्या जमिनीबाबत वारसाहक्काने फेरफार नोंद घेण्यात आली होती. या फेरफार नोंदीवरून संजय कनके यांचा आक्षेप होता.त्यांनी सदर फेरफार नोंद तात्काळ रद्द करण्याची मागणी ग्राम महसूल अधिकारी पवन तुपकर यांच्याकडे केली.
यावेळी तुपकर यांनी सदर विषय हा त्यांच्या अधिपत्याखाली नसून मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याचे स्पष्ट केले.नियमानुसार फेरफार नोंदीवर आक्षेप असल्यास मंडळ अधिकारी यांच्याकडे सुनावणी होऊन त्यानंतरच निर्णय घेतला जातो,असेही त्यांनी सांगितले.
मात्र यावरून दोघांमध्ये वाद वाढला.रागाच्या भरात संजय कनके यांनी थेट तहसीलदार विजय चव्हाण यांच्या कॅबिनच्या बाहेरील व्हरांड्यात तलाठी तुपकर यांच्या कानाखाली मारल्याचा आरोप आहे.तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांना जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी पवन तुपकर यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 132,131(अ), 352,351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस कॉन्स्टेबल आलका केंद्रे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, तहसीलदार विजय चव्हाण यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली असता तलाठी तुपकर यांनी आपली बाजू मांडली.
त्यांनी सांगितले की,मयत ताराबाई कनके यांच्या वारसाहक्काबाबत संजय कनके यांचे बंधू यांनी फेरफार नोंदीसाठी अर्ज केला होता.त्यानुसार रीतसर नोटीस काढून गावात प्रसिद्धी देण्यात आली होती.वारस असल्याबाबत कोणाचा आक्षेप असल्यास तो नोंदवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.या प्रक्रियेनुसार संजय कनके यांनी फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदवला होता.
त्यामुळे सदर फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदवून पुढील कारवाईसाठी प्रकरण मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले होते.मंडळ अधिकारी यांच्या सुनावणीनंतरच फेरफार नोंद कायम ठेवायची की रद्द करायची,याबाबत निर्णय घेतला जातो,अशी रीतसर प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले.तरीही “आपण फेरफार नोंद घेतलीच कशी,ती तात्काळ रद्द करा,” या मागणीवरून वाद उफाळून आला आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील सुरक्षितता, शेतकरी–प्रशासन संवाद आणि प्रशासकीय प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पोलिस तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले आहे.





Social Plugin