Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावच्या बैलबाजारामुळे ग्रामीण अर्थकारणाला वेग .



श्री सेवागिरी यात्रेत कोठ्यवधींची उलाढाल 

बुध   दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

 पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेतील खिलार जनावरांचा बैल बाजार महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे. बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू झाल्याने या बैलबाजारातून खिल्लार खोंड व बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोमात सुरू आहेत. यातून दररोज कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होवून ग्रामीण अर्थकारणाला गती मिळत आहे.

     यात्रेचे नियोजन करत असताना ग्रामीण भागातील शेतकरी आणि जातिवंत खिलार जनावरे केंद्रबिंदू मानून देवस्थान ट्रस्टने यात्रा भरविण्यास सुरुवात केली. या बैल बाजाराला गेली ७७ वर्षाची परंपरा लाभलेली आहे. सातारा, सोलापूर, बारामती, पुणे सांगली, खरसुंडी जिल्ह्यातून शेतकरी व व्यापार्‍यांनी आपले खिल्लार बैल, खोंड तसेच गायी विक्रीसाठी आणल्या आहेत. विशेषतः पुणे जिल्ह्यातील शेतकरी गाय व बैलांची खरेदी करताना दिसत आहेत. जातीवंत खिल्लार खोंड व बैलांच्या किंमती ५० हजारांपासून १० लाख रुपयांपर्यंत आहेत. शेतकरी व व्यापार्‍यांनी गाय व बैलांच्यासाठी खास मंडपातील दावणी उभारल्या आहेत. 

बैलबाजारात पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांच्या आरोग्यासाठी आरोग्य पथक नेमले आहे. प्रत्येक जनावरांचे लसीकरण, औषधोपचार, फिरता दवाखाना, तांत्रिक मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. चार दाती (चौसा), दोन दाती (दुसा ) बैल जोड्या शौकिनांचे आकर्षण ठरत आहेत. कोसा खिलार खोंडांना ५ लाखांहून अधिकची मागणी होत आहे.

पुसेगाव मधील खिलार बैल बाजारात शेतकरी, बैलगाडी शौकीन व व्यापाऱ्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे दररोज कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे.

चपळ, दणकट तसेच वेगाने धावणारी जात म्हणूनच शर्यती साठी खिल्लार जातीवंत खोडांच्या मागणीत वाढ तर खिलार बैलांचा वापर शेतीसाठी होतो. बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यामुळे अशा जातिवंत खोंडाना मागणी कमी झाली होती. परंतु, आता शर्यती सुरु असल्याने या खोडांना मोठी मागणी वाढली आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर खिलार जनावरांची विक्री झाली असल्याचे बैलबाजारातील शेतकऱ्यांनी सांगितले.