Ticker

6/recent/ticker-posts

पानी फाउंडेशन चळवळीतील जलयोद्धा हरपला...



पारनेर प्रतिनिधी भानुदास आग्रे 

माजी सरपंच अर्जुनशेठ देशमाने तुम्ही पानी फाऊंडेशन टीम ला सोडून अकाली exit घेतली... आणि आम्हा सर्व टीम ची मने हळहळली... कुठेतरी पोकळी निर्माण झाली... काही न कळता असे आकस्मिक सोडून जाणे आम्हालाही पटले नाही... अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या होत्या. तशेच भविष्यातील कामांची आखणी करायची होती आणि ती पूर्ण ही करायची होती तुमच्या सोबतीने आणि साथीने खांद्याला खांदा लावून... त्या दिवशी तर तुमच्या बद्दल लिहायला शब्दही फुटत नव्हते आणि खरे ही वाटत नव्हते की अशी दुःखद घटना घडू शकते...

आपल्या आयुष्यातील तुमच्या सारखा माणूस पहिल्यांदा पाहिला आणि अनुभवला असेल की ज्याला सामाजिक भान, समाजेसेवची आवड, विरोधकांबद्दल सुद्धा आपुलकी होती... 

आपण सर्वांनी पानी फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत कार्यकाळात गावात मनसंधारण करून सामाजिक चळवळ उभी केली त्यात तुमचा सिंहाचा वाटा आज कोणीही नाकारू शकत नाही.. एका ध्येयाने झपाटून तुम्ही काम केले.. तरुणांनाही लाजवेल अशी ऊर्जा तुमच्या मध्ये होती.. कोणत्याही कामाला तुम्ही नाही म्हटला नाहीत.. आजही मोबाइल मधील जुने फोटो पाहत असताना तुमचा शेततळ्याच्या कागद डोक्यावर घेतलेला फोटो नजरेखालून गेला... पोकलेन मशिनरी ड्रायव्हर ला उठवून मशीन चालू करायला सांगायची तुमची सकाळची 6 वाजताची वेळ ठरलेली असायची.. टार्गेट पेक्षा 1 लाख घनमीटर काम जास्त करून दाखवले.. 

आजही 800 हेक्टर पठारावर टाकलेल्या शेत तालींचा फायदा नांदूर पठार सकट आजुबाजूच्या कळस, गारखिंडी गावाला होत आहे.. कोणताही राजकीय वरद हस्त नसताना सुद्धा कोट्यावधींची कामे तुम्ही मार्गी लावली... तुम्ही तुमच्या "ना खाऊंगा.. ना खाणे दुंगा" तत्वाशी एकनिष्ठ राहिलात... याचाही अभिमान वाटतो...

गावासाठी सर्वात जास्त वेळ देणारा सरपंच म्हणून नांदूर पठाराच्या इतिहासात नोंद राहील.. तालुक्यात पाणीदार नांदूर पठार म्हणून जी ओळख निर्माण झाली ती सुद्धा तुमच्याच काळात... नांदूर पठार चे नाव महाराष्ट्रात गाजले... आजही तो क्षण आठवतो आहे.. जितेंद्र आणि स्पृहा जोशी चा आवाज कानात घुमतो आहे... तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेते श्री. आमिर खान यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारतानाचा फोटो डोळ्यासमोर तरळतो आहे... बहुतांशी नांदुरकरांचे स्टेटस होते... 

"पारनेर तालुका... प्रथम पारितोषिक विजेता गाव नांदूर पठार.."

एक नाही तर दोन दोन वेळा हा आवाज बालेवाडी स्टेडियम पुणे येथे ऐकायला मिळाला..

वॉटरकप स्पर्धा – २०१८

फार्मर कप स्पर्धा – २०२२

असे तुम्ही एकमेव सरपंच असाल की, तुमच्या कार्यकाळानंतर सुध्दा शेतकऱ्यांची एकजूट करून गावासाठी स्पर्धा जिंकणारे...शेतीला आधुनिकतेची जोड देऊन पठारी भागावर कमी पाण्यात उत्तम नियोजन करून शेती सुद्धा नफ्यात येऊ शकते हे आदर्श उदाहरण तुम्ही सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काम करून दाखवून दिले.. सोयाबीन चे विक्रमी उत्पादन आणि सोयाबीन खरेदी विक्री चा एक यशस्वी व्यवसाय सुध्दा आपण अलीकडच्या काळात करून दाखवला...

सर्वांशी गोडी गुलाबीने बोलण्याची लकब आणि कोणी कितीही अपप्रचार केला, दुष्ट वागणूक दिली, खडे बोल सुनावले तरीही ऐकून घेण्याची क्षमता तुम्ही ठेवल्यामुळे एक यशस्वी राजकारणी म्हणून सुद्धा तुमच्याकडे पाहिले जात होते...तुमच्या शेवटच्या दर्शनाला जमलेला जनसमुदाय आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती च तुमच्या बद्दल सर्व काही सांगून जाते... आम्हा सर्व नांदूर पठार पानी फाउंडेशन परिवाराला मनाला चटका लावून जाणारी घटना नकळत घडली.. हळहळ वाटते की...

सरपंच... तुम्हाला अजून बरेच काही पाहायचे होते आणि आपल्या सर्वांना पुढील काळात तुमच्या साथीने हिवरेबाजार, राळेगण सिद्धी, पाटोदा या गावांसारखे आपल्या गावाला "समृद्धगाव नांदूर पठार" बनवायचे होते...

तुमची स्वप्न आम्ही सर्व मिळून नक्कीच पूर्ण करू हीच तुम्हाला नांदूर पठार ग्रामस्त व पुणेकर मुंबईकर तुम्हाला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली!!!