Ticker

6/recent/ticker-posts

शासन कसे चालते? विद्यार्थ्यांसमोर पोलीस-महसूल-प्रशासनाचा थेट परिचय






विद्यार्थ्यांची प्रशासनाशी थेट भेट; पोलीस-महसूल-प्रशासनाचे कामकाज मुलांसमोर उलगडले

*सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा ----  शाळेच्या भिंतीआडचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरवणाऱ्या ‘सहल विद्यार्थ्यांची व दखल प्रशासनाची’ या उपक्रमाने सिंदखेडराजात प्रशासन व विद्यार्थ्यांमधील अंतरच मिटवले. दि. २३ डिसेंबर रोजी पंचायत समिती सिंदखेडराजा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव राऊत येथील विद्यार्थ्यांनी सिंदखेडराजा येथे पोलीस, महसूल, शिक्षण व उपविभागीय प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख घेत प्रशासनाच्या कामकाजाचा जिवंत धडा अनुभवला.

या शैक्षणिक सहलीचे नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापक पंढरीनाथ बुरकुल, शिक्षक नंदकिशोर निलख व मॅडम मनिषा राऊत यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या विविध विभागांचे कार्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.

सहलीची सुरुवात पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथून झाली. दुय्यम ठाणेदार बालाजी सानप यांनी विद्यार्थ्यांना कायदा-सुव्यवस्थेचे धडे देत पोलीस यंत्रणा कशी काम करते, नागरिकांची सुरक्षा कशी राखली जाते, तसेच शिस्त, नियम व जबाबदारीचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रश्नांनी पोलीस ठाण्याचा परिसर चैतन्यमय झाला.

यानंतर विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे भेट देत महसूल प्रशासनाची ओळख करून घेतली. तहसीलदार अजित दिवटे यांच्या कार्यालयात सातबारा, जमीन नोंदी, विविध दाखले, आपत्ती व्यवस्थापन तसेच शासनाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. कागदोपत्री कामकाजामागील प्रशासनाची जबाबदारी यावेळी विद्यार्थ्यांना उलगडली.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी पंचायत समिती सिंदखेडराजा येथील गटशिक्षणाधिकारी निकम साहेब यांनी शिक्षण विभागाला भेट देत शैक्षणिक प्रशासनाचे कार्य, शाळा व्यवस्थापन, शासनाच्या शैक्षणिक योजना व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये विशेष कुतूहल दिसून आले.

यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट देत प्रा. संजय खडसे यांच्या कार्यालयातून उपविभागीय प्रशासनाची सूत्रे, विविध विभागांतील समन्वय व निर्णयप्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली. “प्रशासन म्हणजे नेमके काय?” या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना या भेटीतून प्रत्यक्ष अनुभवातून मिळाले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाबाबत कुतूहल, आदर व जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. भविष्यात सुजाण, कायदेपालक व सजग नागरिक घडवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना व्यक्त होत असून, शिक्षक, पालक व प्रशासनाकडून या उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे.