Ticker

6/recent/ticker-posts

द’ नव्हे दारूचा… ‘द’ फक्त दुधाचा!





भेंडा येथे नववर्ष स्वागतासाठी व्यसनमुक्तीचा आगळावेगळा उपक्रम

संतोष फुलारी @ भेंडा ग्रामीण (प्रतिनिधी):

सरत्या २०२५ वर्षाला निरोप देत आणि २०२६ या नववर्षाचे स्वागत आरोग्यदायी व विधायक संकल्पाने करण्यासाठी भेंडा येथे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ‘द’ नव्हे दारूचा… ‘द’ फक्त दुधाचा! या संदेशाखाली दारूऐवजी दूध पिण्याचा संकल्प करत व्यसनमुक्तीचा जागर करण्यात आला.

मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या उपक्रमांतर्गत “३१ डिसेंबर – एक नवा संकल्प” असा निर्धार करण्यात आला. नको दारूचा पेला, नको नशा; घेऊ या दुधाचा आस्वाद, बदलू या दिशा! या प्रेरणादायी घोषवाक्यांमुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश दारू व इतर व्यसनांपासून दूर राहून आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारणे हा होता. नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या मद्यपानाऐवजी दूध पिण्याचा संदेश देत समाजात व्यसनमुक्तीची चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला.या प्रसंगी  काळे दत्तात्रय ,डॉ.शिंदे शिवाजी,पत्रकार सुकदेव फुलारी,डॉ.संतोष फुलारी,वा यकर अशोकराव,इंजि.नयन फुलारी,देवेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. संतोष फुलारी हॉस्पिटल, भेंडा गट यार्ड येथे आज (दि. ३१ डिसेंबर २०२५) रात्री ७ वाजता हा उपक्रम पार पडला. या वेळी युवक, नागरिक व मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून दूध पिऊन नववर्षात आरोग्य जपण्याचा संकल्प केला.

नववर्षाच्या स्वागतासाठी समाजाला सकारात्मक दिशा देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत असून, अशा विधायक उपक्रमांतूनच निरोगी व व्यसनमुक्त समाजनिर्मिती साध्य होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.