लाखो भाविकांची रेलचेल, बैलगाडी शर्यत, कुस्ती,कृषी प्रदर्शन मुख्य आकर्षण
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे दरवर्षी भव्यतेने साजरा होणारा श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव आणि यात्रा हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा एक मोठा आर्थिक स्त्रोत आहे. यात्रेदरम्यान होणाऱ्या बैलगाडा शर्यती, खिल्लार बैल बाजार, कृषी प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, तसेच हजारो व्यापाऱ्यांची उपस्थिती यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. स्थानिक शेतकरी, व्यावसायिक, दुकानदार, वाहतूकदार, तसेच विविध सेवा देणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. त्यामुळे ही यात्रा खर्या अर्थाने ग्रामीण भागाची अर्थवाहिनी ठरते.
सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने साजरा होणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेला यंदा १४ ते २४ डिसेंबर दरम्यान सुरुवात होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यांसह विविध राज्यांतून येणाऱ्या लाखोंच्यावर भाविकांचा मेळा पुसेगावात भरतो. ग्रामीण संस्कृती, परंपरा, श्रद्धा, क्रीडा आणि व्यापार यांची एकत्रित पर्वणी म्हणून ही यात्रा ओळखली जाते.
श्री सेवागिरींचा इतिहास : पुसेगावच्या ओळखीचा पाया
सन १९४७ मध्ये श्री सेवागिरी महाराजांनी येरळा नदीकाठी पुसेगाव येथे संजीवन समाधी घेतली. त्यांच्या जीवनकार्याचा, अध्यात्मिक कार्याचा, आणि शेतकरी व ग्रामीण जनतेच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्रात पसरला. त्यानंतर १९४८ मध्ये पहिल्यांदा रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर ही परंपरा दरवर्षी अधिक तेजाने वाढत गेली.
बैल बाजार ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा
पुसेगावचे मूळ स्वरूप कृषीप्रधान असल्याने, यात्रेच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःची बैले बांधून बैल बाजाराची सुरुवात केली. कालांतराने हा बाजार राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरला आणि आज तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा व नामांकित ‘खिल्लार बैल बाजार’ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मराठवाडा, खानदेश येथून शेतकरी येतात.
उच्च दर्जाच्या बैलजोड्या, खिल्लार, दंगी यांसारख्या जातींची मागणी. खरेदी-विक्री सोपी व्हावी म्हणून पारदर्शक व्यवस्था.
बैल बाजारामुळे पुसेगावात यात्रेच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
‘सेवागिरी हिंदकेसरी’ सर्वोच्च किताब
श्री सेवागिरी महाराजांची बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित मानली जाते. या शर्यतीत ११०० ते १२०० बैलजोड्या सहभागी होत असून शर्यतीचे मैदान राज्यभर प्रसिद्ध आहे. पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धत, कटाक्षाने नियम अंमलबजावणी,
प्रेक्षकांसाठी सुरक्षित व्यवस्था, ‘सेवागिरी केसरी’ किताब जिंकणाऱ्या बैलाची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाते. यामुळे राज्यभरातील बैलगाडी शौकीनांची ही शर्यत सर्वोच्च मानाची मानली जाते. अनेक शौकीन गुलाल मिळावा म्हणून बैलगाडी मालक सर्वतोपरी प्रयत्न करत असतात.
कुस्ती अखाडा – महाराष्ट्रातील नामांकित मल्लांचे आकर्षण
कुस्ती परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने पुसेगावात कायमस्वरूपी गोलाकार कुस्ती मैदान उभारले आहे.
वारणेच्या आखाड्याप्रमाणे सुबक रचना, वजन गटांनुसार कुस्त्या, सर्व लढती निकाली, हजारो प्रेक्षकांसाठी गॅलरी, महाराष्ट्रातील नामांकित मल्लांचे आगमन यानिमित्ताने होत असते.
कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञानमेळा
वातावरणातील बदल, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, पाणी बचत प्रणाली, सुपीकता व्यवस्थापन, यंत्रसामग्री, ड्रोन तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर आधारित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दरवर्षी यात्रेचा महत्त्वाचा भाग असतो. येथील प्रदर्शनात शेतीतील नवीन यंत्रसामग्री,
पाणी बचत साधने,
नवीन बियाणे व खत उत्पादने, बदलत्या हवामानाशी निगडित मार्गदर्शन संस्थांकडून केले जाते. शेती क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे व्यासपीठ ठरते.
विद्यार्थ्यांना कलामंच : ‘श्री सेवागिरी युवा महोत्सव’
सातारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची सुवर्णसंधी म्हणजे श्री सेवागिरी युवा महोत्सव. या महोत्सवात गायन, नृत्य, अभिनय, लोककला प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळते. या महोत्सवामुळे अनेक विद्यार्थ्यांचे कलागुण उलगडत आहेत.
व्यापाऱ्यांची दाटी, खरेदीची लगबग यात्रेदरम्यान पुसेगावात हजारो दुकानदार येतात.
महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने, खेळणी, कपडे, दागिने, कृषी उपयोगी साहित्य, विविध खाद्यपदार्थ, मनोरंजन साधने येत असतात.
क्रीडा स्पर्धांची पर्वणी
यात्रेतील क्रीडा कार्यक्रम तरुणांसाठी विशेष आकर्षण ठरतात. यावर्षी—भव्य क्रिकेट सामने, अखिल भारतीय शूटिंग व्हॉलीबॉल,
राज्यस्तरीय कबड्डी, श्री सेवागिरी मॅरेथॉन स्पर्धा, बँड महोत्सव, श्वान शर्यत, खिल्लार जनावरांचे प्रदर्शन असे अनेक उपक्रम श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट कडून आयोजित करण्यात आले आहेत.
यात्रेत कोट्यावधींची उलाढाल
श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल, स्थानिक रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांना थेट फायदा, व्यापार, वाहतूक, निवास, खाद्य व इतर व्यावसायिकांना मोठा लाभ होत असतो. श्री सेवागिरी यात्रा म्हणजे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राला आर्थिक उर्जास्त्रोत ठरते.
जिलेबी व फरसाण खास आकर्षण
श्री सेवागिरी यात्रेचे आणखी एक अविस्मरणीय आकर्षण म्हणजे गरमागरम तारेसारखी जिलेबी आणि खमंग फरसाण. भाविक व यात्रेकरू या पदार्थांचा जिलेबीच्या दुकानात आस्वाद घेत गप्पांचा फड रंगवताना दिसतात. तसेच महाराष्ट्रातून आलेले भाविक व यात्रेकरू मोठ्या प्रमाणावरती जिलेबी व फरसाण खरेदी करून घरी नेत असतात.
भाविकांसाठी सर्व सुविधा सज्ज : संतोष वाघ
(कोटमध्ये संतोष वाघ फोटो वापरणे)
"श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी लाखो भाविक येणार असून, त्यांच्यासाठी पाणी, वीज, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि प्रशासन एकत्र येऊन यात्रेचे आयोजन अधिक सुकर करण्यासाठी कार्यरत आहे. दुकानदारांनी जागांसाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात त्वरित संपर्क साधावा."
श्री संतोष वाघ
चेअरमन, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव





Social Plugin