गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
मान-सन्मान जपणाऱ्या परिवारावर चिखलफेक नको; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभिषेक खारतोडे पाटील यांनी स्वपक्षीय नेत्यालाच सुनावले खडेबोल
दौंड: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठित अशा शितोळे परिवाराबाबत केलेल्या एका विधानामुळे संपूर्ण दौंड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.चाकणकर यांच्या या 'बेताल' वक्तव्याचा समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध केला जात असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.शितोळे परिवार हा दौंड तालुक्यातील एक मान-सन्मानाने वागणारा आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा परिवार म्हणून ओळखला जातो. या परिवाराने आजवर अनेक उच्च पदांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासात आणि सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. अशा प्रतिष्ठित परिवाराच्या परंपरेवर आणि अस्तित्वावर थेट भाष्य करणे तालुक्याला रुचलेले नाही. "ज्या परिवाराने पिढ्यानपिढ्या लोकांच्या सुख-दुखात सहभाग घेतला, त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे," अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते अभिषेक खारतोडे पाटील यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.त्यांनी म्हटले की, रुपालीताई चाकणकर यांनी महिलांच्या प्रश्नांवर काम केले असले तरी शितोळे परिवाराबाबत त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. प्रत्येक परिवाराची आपली एक गौरवशाली परंपरा असते आणि ती जपण्याचा अधिकार त्या परिवाराला असतो. ही परंपरा कोणीही रोखू शकत नाही आणि तसा प्रयत्न देखील करू नये.
सध्या सोशल मीडियापासून ते गावच्या चावडीपर्यंत सर्वत्र शितोळे परिवाराच्या समर्थनार्थ पोस्ट आणि चर्चा पाहायला मिळत आहेत. "आम्ही शितोळे परिवारासोबत कायम खंबीरपणे उभे आहोत," असा सूर तालुक्यातून उमटत असून, चाकणकर यांनी आपल्या विधानाचा फेरविचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एका प्रतिष्ठित घराण्यावर करण्यात आलेल्या या टीकेमुळे आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे देखील बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





Social Plugin