Ticker

6/recent/ticker-posts

●आदमपूरात खंडोबा पालखीचा वार्षिक महोत्सव उत्साहात....



●आदमपूर:मौजे आदमपूर,(ता.बिलोली)

 येथे दरवर्षीप्रमाणे श्रीक्षेञ माळेगांव याञेपूर्वी याही वर्षी श्रीदैवत खंडोबा देवाचा अर्थात श्री.मल्हारी मार्तंडांचा एकोणीसावा वार्षिक दिंडी व पालखी याञा  महोत्सव दि.११ डिसेंबर रोजी गुरूवारी दुपारी वाजतगाजत संपन्न झाला.जागरण कर्ते म.भ.पा.पांडुरंग महाराज वाघे नरसीकर,बळी महाराज वाघे रामतिर्थकर,वारू मंडळी शंकर भरगिरे,पप्पू भरगिरे,माधव भरगिरे, बालाजी डोईफोडे,रामदास देवारे, राम देवारे,मारोती पेंटे,योगेश डोईफोडे,बालाजी पेटेकर,माधव बोडके,बालाजी हरनाळीकर,आत्माराम भरगिरे,बिरप्पा येतोंडे 

आदिंचा सहभाग होता.केरूर येथील पालखीचाही सहभाग सदरील दिंडीत होता.येथील श्री.खंडोबा मंदिरावरील पुजारी शिवानंद महाराज डोईफोडे आदमपूरकर व खंडोबा अनुयायी व गावकरी यांच्या सहकार्याने ही याञा आयोजित केली जाते.देव मल्हारी मार्तंड पालखीची सुरूवात पुजारी शिवानंद डोईफोडे महाराज यांच्या घरातून परंपरागत वाजत गाजत दुपारी सुरूवात भक्तगणांनी केली. गावातील विविध मंदिरांचे दर्शन करीत पालखीचे गावातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण सुरू झाले.चाबूक, डफ, तुणतुण्याच्या लयीत वारूंनी पालखी प्रस्थानावेळी रंगत आणली. पिवळ्या धमक भंडाऱ्यात आसमंत न्हाऊन निघाले. पिवळे निशाण डौलाने फडफडत होते.फुले, खोबरे,रेवडी आणि बत्ताशांची मुक्त उधळण झाली. आदमपूरसह गाव परिसरातील अनुयायी यावेळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरील पालखीचे सायंकाळी खंडोबा मंदिर परिसरात आगमन होऊन धूप,आरतीने समारोप केला गेला.त्यानंतर लगेच सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याञेत खेळणी तथा मिठाई व्यापारी आपली दुकाने भरगच्च लावल्याने अबाल वृध्दांसह लहान मुलांनी बाजार गजबजून गेला.प्लॅस्टिक पुंगीच्या पिपाण्या वाजवण्यात मुले दंगून गेली. 'सदानंदाचा येळकोट,येळकोट,जय मल्हार' आदि घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.राञी उशिरापर्यंत मंदिरावर नरसीकर वाघे महाराज संच, मुरळी,वारू यांचा जागरण, गोंधळाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात यथोचित संपन्न झाला.लोककला आणि परंपरागत चालत आलेल्या संस्कृतीचा हा सोहळा आजही ग्रामीण भागात अबाधित आहे,हे विशेष.गाव परिसरातील राजकीय,सामाजिक प्रतिनिधी, खंडोबा देवाचे भाविक भक्तगण,विविध गावातील वारू,वाघे,गावातील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी, व्यावसायिक आजी, माजी ग्रामपंचायत पदाधिकारी,गावकरी आदि बहुसंख्येने याञा महोत्सवात सहभागी होते.