Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर शाळेत क्रिडा सप्ताह संपन्न



प्रतिनिधी@ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

 दिनांक 29 डिसेंबर/ येथील इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर शाळेत दिनांक 26 ते 28 डिसेंबर दरम्यान क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.  

             दिनांक 26 नोव्हेंबर रोजी डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे साहेब यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार  समितीचे सचिव जिवनसिंह दिनोरे सर होते. यावेळी उपाध्यक्ष दिलीप कळसकर, विजय काळे, केंद्रप्रमुख रायमुलकर, बुलढाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक शिरसाट, डोणगाव शाखा प्रमुख वाहेकर, शाळेचे मुख्याध्यापक सुनील गाढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार यांनी केले, सरनाईक यांनी आभार मानले.

           26 नोव्हेंबरला शाळेच्या भव्य प्रांगणात सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व मशाल पेटवून क्रीडा सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक  नागरे साहेबांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे महत्व पटवून दिले तसेच सोशल मीडियाचा वापर व त्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिनोरे सरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून शुभेच्छा दिल्या.तत्पूर्वी मुख्याध्यापक गाढे सरांनी प्रास्ताविकाद्वारे शालेय उपक्रम व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  त्यानंतर कबड्डी, खोखो, रस्सीखेच, लिंबू चमचा, संगीत खुर्ची असे सांघिक खेळ,  लांब उडी, भालाफेक, गोळा फेक, मैदानी स्पर्धा, वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या गटांचे प्रतिनिधित्व करीत उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. मैदानावर खेळताना, धावताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जोश आणि जिंकण्याची जिद्द स्पष्ट दिसत होती. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आणि खेळाडू वृत्ती   वाढण्यास मदत झाली.  विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले. हा क्रीडा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी. एक अविस्मरणीय अनुभव ठरला. विद्यार्थ्यांच्या आनंद द्विगुणित  करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिशय मेहनत घेतली.