छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथे दि. २०/१२/२०२५ ते २३/१२/२०२५ या कालावधीत चार दिवसीय भरडधान्य (Millet) प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. सदरील प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. दिप्ती पाटगावकर मॅम, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयोजनाने करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये भरडधान्यांचे आरोग्यदायी परिणाम, आहारातील महत्त्व तसेच त्यावर आधारित विविध प्रक्रिया केलेले मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षणास महिला व पुरुष प्रशिक्षणार्थींचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.
डॉ. दिप्ती पाटगावकर मॅम यांनी मिलेटविषयी खूपच बारकाव्याने मार्गदर्शन करताना मिलेटचे आरोग्यदायी फायदे, आहारातील स्थान आणि महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. यासोबतच मिलेटसंदर्भातील शासनाच्या विविध योजना , पॅकेजिंग व लेबलिंग कसे करावे, तसेच उत्पादनाचे मार्केटिंग कसे करावे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित प्रशिक्षणार्थींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा देत त्यांनी मार्गदर्शनात्मक विचार मांडले.
या चार दिवसीय प्रशिक्षणात डॉ. दिप्ती पाटगावकर मॅम (कार्यक्रम समन्वयक, KVK)श्रीमती छायाताई साबदे यशस्वी उद्योजिका, सिद्धी गृहउद्योग, तसेच उद्योजिका जयश्रीताई देगावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण अत्यंत उत्साहात पार पडले.
प्रशिक्षणादरम्यान छायाताई साबदे यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा यांचे लाडू, तसेच मिलेट चकली, शेव, मिलेट भेल, मिलेट इडली व आप्पे तयार करण्याचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवले.तर जयश्रीताई देगावे यांनी मिलेट आंबील तसेच नाचणीच्या पिठाचा केक कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थींना शिकवले.
या चार दिवसांत सर्व महिला व पुरुष प्रशिक्षणार्थींनी मिलेट प्रशिक्षणासाठी भरभरून उत्साह, जिज्ञासा आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. दि. २३/१२/२०२५ रोजी प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. यावेळी व्यासपीठावरश्री. शिंदे सर, श्रीमती. सुनंदा क्षीरसागर, श्री. राठोड सर, श्री. हिंगोले सर, श्री. ओंकार नचित, डॉ. बस्वराज पिसुरे सर, डॉ. अनिता जिंतुरकर मॅम तसेच श्रीमती छायाताई साबदे यांची उपस्थिती होती.
या वेळी प्रशिक्षणार्थीच्या वतीने डाॅ यशवंत पवार आणी पल्लवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. हा प्रशिक्षण कार्यक्रम आरोग्यदायी आहार, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबी उद्योजकतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





Social Plugin