दुधगांव : प्रतिनिधी
दुधगांव येथे शासनाच्या निर्देशानुसार बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत थकीत कर वसुलीसाठी ५० टक्के सवलत देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेत घरपट्टी व पाणीपट्टीवरील कोणतीही सवलत न देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने या निर्णयाला पाठिंबा दिल्याने गावात शिस्तबद्ध करप्रणालीचा आदर्श निर्माण झाला आहे.
विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीकडे थकीत असलेल्या कराबाबत सविस्तर चर्चा झाली. गावाच्या विकासकामांचा वेग कायम ठेवायचा असल्यास कर माफी किंवा सवलतीच्या योजना व्यवहार्य ठरणार नाहीत, असे सभेत स्पष्ट करण्यात आले. सवलत दिल्यास ग्रामपंचायतीच्या महसुलात मोठी घट होऊन आवश्यक कामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
यावेळी थकीत करदारांनी कोणत्याही परिस्थितीत घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम माफीची अपेक्षा न ठेवता भरावी, तसेच कर थकवणाऱ्या नागरिकांना दाखले, उतारे किंवा शासकीय लाभ न देण्याचा ठराव सभेत सर्वानुमते करण्यात आला.
ग्रामपंचायतीने थकीत करदारांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
ही ग्रामसभा सरपंच सौ. करिष्मा पाखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच अविनाश भोसले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अमित पाटील, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.





Social Plugin