माझे साहित्य आंबेडकरी प्रेरणेचा श्वास - डॉ. सुनिता बोर्डे - खडसे
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
श्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेचा श्वास हेच माझ्या साहित्याचे मर्म व बोली भाषेचा गौरव आहे, असे मत ' फिंद्री ' कादंबरीच्या प्रसिद्ध लेखिका डॉ. सुनीता बोर्डे - खडसे ( सांगली) यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ' मी आणि माझे लेखन' या विषय सूत्रावर आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या वर्षातील थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे होते. विचार मंचावर उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे, विश्वस्त डॉ.जयपाल सावंत व जेष्ठ आंबेडकरी विचारवंत सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. सुनीता बोर्डे -खडसे म्हणाल्या,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा हेच माझ्या जीवन संघर्षाचे व साहित्याचे बळ आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन स्वाभिमानाने खंबीरपणे उभे राहण्याचे सामर्थ्य मला माझ्या आईने दिले. जगण्यासाठी तसेच आत्महत्या करण्यापासून परावृत करण्यासाठी प्रेरणा देणारे साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. सर्जनशील कलाकृतीचे ते प्रयोजन असले पाहिजे ही भुमिका घेऊन मी साहित्य चळवळीद्वारे समाजाला सकारात्मक संदेश देण्याचे काम करीत आहे.
जाती व्यवस्था अजून संपलेली नाही. ती आता नवीन स्वरूपात अवतरत आहे. दारिद्र्य आणि दारू समस्या अधिक तीव्र होत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आपल्या फिंद्री या गाजलेल्या कादंबरीचा प्रवास उलगडताना डॉ. सुनीता बोर्डे- खडसे यांनी उपस्थितांना अक्षरशः सुन्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. जयपाल सावंत यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत साळवे यांनी केले. याप्रसंगी संबोधी प्रतिष्ठानचे संघटक व व्याख्यानमालेचे निमंत्रक दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, प्रतिष्ठानचे विश्वस्त, कार्यकर्ते विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, सभासद तसेच डॉ. प्रकाश कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin