Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेडराजा पंचायत समिती हादरली! तक्रारींचा झंझावात सुरूच - गटविकास अधिकारी अजित बांगर यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?






पंचायत समितीत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस
 अधिकार्‍यांची धांदल! सिंदखेडराजा पंचायत समिती मध्ये तक्रारींची रांगच रांग - पंचायत समितीत गोंधळाचे कढ—नागरिक संतप्त, तक्रारी वेगाने वाढल्या!

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा  :- तालुक्यातील ग्रामपंचायतींतील भ्रष्टाचाराच्या तक्रारींनी पंचायत समितीला अक्षरशः वेढा घातला असून दररोज सरपंच–सचिवांच्या अनियमितता, वित्तीय गैरव्यवहार व मनमानी कारभारासंदर्भातील तक्रारी सतत दाखल होत आहेत. मात्र एवढे गंभीर आरोप समोर येत असतानाही गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी अद्याप एका गावालाही प्रत्यक्ष भेट देण्याची तसदी घेतलेली नाही, ही बाब संतापजनक असल्याचे ग्रामस्थांचे मत.आहे

*१५ व्या वित्त आयोगात मोठी लूट?*

निमगाव वायाळ, वडाळी, किनगाव राजा, हनवतखेड, राहेरी बू यांसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये १५ व्या वित्त आयोगातून घेतलेल्या साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे ग्रामपंचायतींनी आरो फिल्टरची खरेदी निकृष्ट दर्जात केल्याचा आरोप असून दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये निधी हडप केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

*चौकशी अधिकाऱ्यांवरही संशयाचे सावट*

तक्रार करण्यात येताच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चौकशीसाठी हजर होत असले तरी सरपंच– सचिवांकडून आर्थिक देवाणघेवाणीने प्रकरण दडपले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे आहे.

*२४ नोव्हेंबरच्या पत्राला प्रतिसादच नाही!*

गटविकास अधिकारी बांगर यांनी चौकशीसाठी २४ नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. मात्र अद्यापही चौकशी अधिकारी नियुक्त न झाल्याने तक्रारदार मागील दारातील व्यवहारावर बोट ठेवत शंका व्यक्त करीत आहेत.

निमगाव वायाळ येथील तक्रारदारांनी त्रयस्थ, स्वतंत्र संस्थेकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली असून, संपूर्ण विक्रमी तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर संशय निर्माण झाला आहे.

*जनतेची ठाम मागणी*

जर ग्रामसेवक–सचिवांकडून भ्रष्टाचार सिद्ध झाला तर तत्काळ निलंबन ते थेट बडतर्फीची कार्यवाही व्हावी, अशी जोरदार मागणी तालुक्यातून केली जात आहे.

तक्रारींचा आकडा रोज वाढत असताना गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी गावपातळीवर प्रत्यक्ष भेट देत सत्यस्थिती तपासावी, अशी जनतेची मागणी कायम आहे.