●ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
●आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर,गळेगांव परिसरात अत्यल्प प्रमाणात वेळ अमावस्या अर्थात येळवस हा कृषी संस्कृतीतला सण काही शेतकऱ्यांकडून शुक्रवार दि.१९ डिसेंबर रोजी यथोचित साजरा करण्यात आला.आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. राज्यातही शेती परंपरेशी निगडीत सण साजरे होतात. पेरणी केल्यानंतर सातव्या अमावस्येला हा सण साजरा केला जातो.काळ्या आईची यथासांग पूजा करून माती आणि माय लक्ष्मीचे ॠण फेडले जाते.
मूळ कर्नाटक राज्यातील हा सण मुखेड, कंधार, देगलूर,बिलोली अशा काही तालुक्यात साजरा केला जातो.बाहेर परगावी काम व नौकरीनिमित्त वास्तव्यास असणारे सान,थोर घराकडे धाव घेतात.आदमपूर, नवे,जुने गळेगांव परिसरातील काही शेतकरी कुटुंबांनी हा सण साजरा करीत आपली संस्कृती जपलेली आहे.वेळ अमावस्या दिवशी कडब्याच्या काही पेंड्यांची खोपी घातली जाते.त्यात मातीची लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेची तसबीर ठेवली जाते.गोडा धोडाचा नैवेद्य ही दाखवला जातो.शेतातील पांडवांना नवा रंगही दिला जातो.रब्बी हंगामातील गहू, हरभरा,ज्वारी,करडई आदि पिकांत चर शिंपून भरभराटीची प्रार्थनाही केली जाते. ऊन,वारा, पाऊस या निसर्गनिर्मित बाबी आणि पर्यावरण शक्तिरूपींसमोर शेतकरी नतमस्तक होतात.
या हिवाळी ॠतूत मानवी पचनसंस्था उत्तम राहते.स्निग्ध खाद्य पदार्थांचे सेवन केले जाते.फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.खूप भूक लागत असते. दूध,दही,तूप,लोणी,गूळ,तीळ,कडधान्य आदि पदार्थांचा आहारात समावेश केला जातो.अशा परंपरागत शेतीशी संबंधित सण शेतकरी कौटुंबिक साजरा करण्याला जास्त महत्व देत असतात.शेती आणि शेतकरी हे नाते या सणांमुळे अबाधित असेल,यात काहीच शंका नाही.





Social Plugin