भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
: ख्रिसमसच्या उत्साहात नागपूर शहर न्हावून निघाले असतानाच, वर्धा रोडवरील एका प्रसिद्ध क्लबबाहेर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ख्रिसमस पार्टी करून बाहेर पडलेल्या दोन गटांत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. या हिंसक हल्ल्यात २८ वर्षीय प्रणय नरेश नन्नावरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे.
नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा रोडवरील हॉटेल प्राइड चौकातील ‘दाबो’ (Dabo) क्लबमध्ये ख्रिसमस निमित्त विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाकडून पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स आणि पब सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने तरुणांची मोठी गर्दी जमली होती.
पार्टी संपल्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास क्लबबाहेर उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाजवळ (XUV 700) प्रणय आणि त्याच्या मित्रांचा दुसऱ्या एका गटाशी वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची झाली, पण काही क्षणातच या वादाने उग्र रूप धारण केले.
विटा आणि लोखंडी रॉडने हल्ला हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी प्रणय आणि त्याच्या मित्रांवर तिथेच पडलेल्या विटा आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढवला. आरोपी मेहुल रहाटे आणि त्याच्या साथीदारांनी प्रणयच्या छातीवर आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या हल्ल्यात प्रणय नन्नावरे (रा. महाल) आणि त्याचा मित्र गौरव ब्रिजलाल कारडा (३४, रा. कळमना रोड) हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. उपस्थितांनी आणि मित्रांनी त्यांना तातडीने ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती प्रणयला मृत घोषित केले.





Social Plugin