Ticker

6/recent/ticker-posts

वाळू माफियांवर आता 'MPDA' व तडीपारीची कारवाई करणार-तहसीलदार विजय चव्हाण यांचा सज्जड दम.

 

*अंबड महसूल विभागाचा वाळू माफियांवर 'सर्जिकल स्ट्राईक';३० लाखांचा दंड न भरल्याने न्यायालयातून सुटलेली हायवा वाहने तहसीलदारांनी पुन्हा जप्त केली!*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

अंबड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी महसूल प्रशासनाने आज (दि.४)अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पोलिसांतून व न्यायालयातून जामीन मिळवून वाहने सोडवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाळू तस्करांना तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जोरदार धक्का दिला.जोपर्यंत शासनाचा थकीत दंड भरला जात नाही, तोपर्यंत वाहने सोडली जाणार नाहीत,या भूमिकेवर ठाम राहत महसूल पथकाने आज सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास दोन हायवा वाहने पुन्हा जप्त केली.

*नेमकी कारवाई काय ?*

गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी हायवा क्र.MH-२१ BG-८८२२ मालक:आमेर गुलाब बागवान व हायवा क्र. MH-२० GQ-९५९७ मालक:रविंद्र जगन्नाथ पिवळ यांच्यावर गुन्हे दाखल होऊन वाहने जप्त करण्यात आली होती.सदर वाहनांवर उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येकी रु.३०,१०,७००/-(तीस लाख दहा हजार सातशे) इतका दंड ठोठावला आहे.

आज सदर वाहने फौजदारी न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांकडून सोडण्यात येत होती.मात्र, मा.न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट केले होते की, फौजदारी कारवाईतून सुटका झाली तरी महसूल विभागाची दंडात्मक कारवाई अबाधित राहील (JMFC Order Clause 3 & High Court WP 4258/2018).या कायदेशीर बाबीचा आधार घेत,तहसीलदार विजय चव्हाण यांनी दंड भरल्याशिवाय वाहने नेऊ देण्यास मज्जाव केला.

संबंधित मालकांनी दंड भरला नसल्याने,'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६' च्या कलम १७६ व १८० अन्वये 'शासकीय थकबाकी' वसूल करण्यासाठी ही वाहने जागेवरच पुन्हा जप्त करण्यात आली. सदरची धाडसी कारवाई मा.जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल व मा.उपविभागीय अधिकारी श्री. उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नियोजनानुसार पार पडली.या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी कृष्णा येडके,मंडळ अधिकारी विष्णू जायभाय, तलाठी विश्वास ढवळे आणि तलाठी राजेश चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

अवैध धंदेवाल्यांना शेवटचा इशारा (MPDA व तडीपारी):

या कारवाईनंतर तहसीलदार विजय चव्हाण यांनी अवैध व्यवसायात गुंतलेल्यांना कडक इशारा दिला आहे.ते म्हणाले,"महसूल विभागाचा दंड भरल्याशिवाय केवळ न्यायालयाच्या जामीनावर वाहने पळवून नेण्याचे दिवस आता संपले आहेत. इथून पुढे तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक खपवून घेतली जाणार नाही.वारंवार असे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर यापुढे केवळ दंडात्मक कारवाई न करता,त्यांना जिल्ह्यातून तडीपार (Externment) करणे आणि 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्ध करणे यासारख्या कठोर कारवाया करण्यात येतील.कोणाचीही गय केली जाणार नाही."