Ticker

6/recent/ticker-posts

25 वर्षापासून शेतीसाठी मिळत नसलेला रस्ता अखेर झाला मोकळा

 


राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : शेतकरी राजू आनंदराव आंबेकर (रा. अमराईपुरा, ता. आर्णी, जि. यवतमाळ) यांना गेल्या तब्बल २५ वर्षांपासून शेतीसाठी मिळत नसलेला रस्ता अखेर महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून मोकळा करण्यात आला. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि आर्णी पोलीस ठाण्याच्या उपस्थितीत ही कार्यवाही पार पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. राजू आंबेकर यांची महागाव ( ता. दिग्रस ) परिसरात गट नं. ५०/१/क मध्ये शेती असून, या शेतशिवारात जाण्यासाठी ११ फूट कायमस्वरूपी रस्ता देण्याबाबत शासनाने यापूर्वीच आदेश पारित केले होते. मा. अपर आयुक्त, अमरावती विभाग यांच्या पुनरिक्षण अर्ज क्र. १९/बीएनटी-५६/महागांव /जि. यवतमाळ/२०११-१२ अन्वये दि. ०७ मे २०२५ रोजी स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, शेजारील शेतकरी शेख युनूस शेख इस्माईल व त्यांच्या नातेवाईकांनी कायद्याचे उल्लंघन करत गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर दरवर्षी पेरणी करून अडथळे निर्माण केले होते. इतकेच नव्हे, तर राजू आंबेकर यांना जीवघेण्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राजू आंबेकर यांनी गेल्या २५ वर्षांपासून महसूल विभाग दिग्रस येथे लेखी निवेदने देऊन रस्ता मिळण्याची मागणी केली होती.शासनाने आदेश दिले असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने शेतीकाम, पेरणी व उत्पन्नावर मोठा परिणाम होत होता. या प्रकरणी आर्णी पोलीस ठाण्याचा अहवाल दि. ०१/०१/२०२६ (प्राप्त दि. ०५/०१/२०२६) नुसार मा. अपर आयुक्त अमरावती विभाग, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी दारव्हा व ठाणेदार, आर्णी पोलीस स्टेशन यांच्याकडे दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली. पोलीस संरक्षणात व निगराणीत दोन शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊ नये म्हणून ११ फूट रस्ता प्रत्यक्ष मोकळा करून देण्याची कार्यवाही करण्यात आली. अखेर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राजू आंबेकर यांना त्यांच्या शेतात ये-जा करण्यासाठी शासनमान्य रस्ता उपलब्ध झाला असून, यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महसूल व पोलीस प्रशासनाने दिलेला ठोस संदेश असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.