Ticker

6/recent/ticker-posts

​निवडणुकीचे बिगुल वाजले! पाटस-कुरकुंभ भागात इच्छुकांची मांदियाळी; गाठीभेटी अन् फिल्डिंगला वेग.

 


गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी

​पाटस:राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच दौंड तालुक्यातील राजकीय हालचालींनी उच्चांक गाठला आहे. विशेषतः पाटस-कुरकुंभ जिल्हा परिषद गट आणि अंतर्गत पंचायत समिती गणांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात या दोन्ही नेत्यांच्या गटातून अनेक समर्थकांनी 'गुडघ्याला बाशिंग' बांधले असून, सध्या गावागावांत गाठीभेटी आणि 'फिल्डिंग' लावण्याचे काम जोमाने सुरू झाले आहे.

​प्रतिष्ठेची लढाई आणि आरक्षणाचे पेच

​हा गट आमदार राहुल कुल (भाजप) आणि रमेश थोरात (राष्ट्रवादी) या दोघांसाठीही प्रतिष्ठेचा मानला जातो. यावेळी जिल्हा परिषद गट 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी राखीव झाल्याने दोन्ही गटांतील महिला पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. तर पंचायत समितीचे पाटस आणि कुरकुंभ हे दोन्ही गण 'सर्वसाधारण' असल्याने तिथेही पुरुष उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.

​इच्छुकांची मोठी फळी:

​१. जिल्हा परिषद (महिला राखीव):

​थोरात गट: आशा नितीन शितोळे, ज्योती शिवाजी ढमाले, पूनम सुशील शितोळे, शितल गणेश चव्हाण.

​कुल गट: वैशाली वाबळे, प्राची शितोळे, मीनाक्षी देशमुख, सई शितोळे.

​२. पंचायत समिती (पाटस गण):

​थोरात गट: स्वप्नील भागवत, सागर शितोळे, अभिषेक खारतोडे.

​कुल गट: जयंत पाटील, संभाजी बापू खडके, प्रताप भागवत.

​३. पंचायत समिती (कुरकुंभ गण):

येथे कुल गटातून इच्छुकांची मोठी गर्दी असून स्वप्नील शितोळे, गेणदेव आटोळे, राहुल भोसले, राहुल शितोळे, कालिदास ननावरे आणि बापू भागवत हे शर्यतीत आहेत.

​गावभेटी आणि जनसंपर्कावर भर

​निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून इच्छुकांनी मळद, पांढरेवाडी, जिरेगाव, कुसेगाव, रोटी, रावणगाव, वासुंदे यांसारख्या १३ गावांमध्ये आपला संपर्क वाढवला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेणे, स्थानिक कार्यक्रमांना हजेरी लावणे आणि सोशल मीडियावरून शक्तीप्रदर्शन करणे सुरू झाले आहे. एकाच गटातून अनेक इच्छुक असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाची 'फिल्डिंग' यशस्वी ठरणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

"गेल्या ९-१० वर्षांपासून मी जनतेच्या सुख-दु:खात सहभागी असून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला पदाच्या माध्यमातून काम करायचे आहे. पक्षाने उमेदवारी देताना धनगर समाजाचा विचार केल्यास, त्याचा मोठा फायदा जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी होईल."— अभिषेक खारतोडे (इच्छुक उमेदवार, पंचायत समिती)