गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
बिरोबाचीवाडी : तालुक्यातील बिरोबाचीवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात बिबट्याचे पिल्लू दिसल्याचा दावा एका तरुणाने केल्याने परिसरात खळबळ उडाली असून, ही घटना नक्की सत्य आहे की केवळ अफवा, याबाबत आता वनविभागाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी स्थानिक तरुण राहुल सुनील गावडे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास शेतात वावरत असताना त्यांना अचानक समोर बिबट्याचे एक लहान पिल्लू दिसून आले. बिबट्याचे पिल्लू दिसताच राहुल गावडे प्रचंड घाबरले. पिल्लू आसपास आहे म्हणजे मादी बिबट्याही जवळपासच असणार, या भीतीने त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारली.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण:
राहुल गावडे यांनी विहिरीत उडी मारल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर बिरोबाचीवाडी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता भीतीपोटी शेतात जाणे टाळले असून, रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे.
वनविभागाला पाचारण:
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी खरोखरच बिबट्याचे ठसे आहेत का, याची पाहणी वनविभागाचे अधिकारी करणार आहेत. दरम्यान, काही गावकऱ्यांच्या मते ही केवळ अफवा असू शकते, तर काहींनी राहुल यांच्या दाव्याला गांभीर्याने घेण्याची विनंती केली आहे.
"मी शेतात काम करत असताना मला अचानक बिबट्याचे पिल्लू दिसले. मादी बिबट्या हल्ला करेल या भीतीने मी विचार न करता विहिरीत उडी मारली. ही कोणतीही अफवा नसून मी ते डोळ्यांनी पाहिले आहे." — राहुल सुनिल गावडे (प्रत्यक्षदर्शी तरुण)
वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा आणि नागरिकांची भीती दूर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे





Social Plugin