Ticker

6/recent/ticker-posts

भेंडा ग्रामस्थांची स्व. अजितदादा पवार यांना बंद पाळून आदरांजल.



 भेंडा बु //ग्रामीणप्रतिनिधी,

नेवासा तालुक्यातील भेंडा गावात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर भेंडा बसस्थानक चौकात शोकसभा आयोजित करून ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गावात कडकडीत बंद पाळून स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शोकसभेच्या सुरुवातीस स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक वाटचालीत स्व. अजितदादा पवार यांचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या निधनामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या शोकसभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, माजी सरपंच अशोकराव मिसाळ, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस गणेश राव गव्हाणे, बाबासाहेब नवले, पत्रकार सुखदेव फुलारी, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ गरड, अंबादास  गोंडे, उद्योजक बापूसाहेब नजन, नामदेव शिंदे, किशोर मिसाळ, भाऊसाहेब फुलारी,  यांच्यासह अनेक मान्यवर, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला. सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले कार्य, विकासाभिमुख धोरणे आणि सर्वसामान्यांशी असलेले नाते यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

भेंडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुमनताई मिसाळ यांनी गावातील सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवून स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भेंडा गावातील व्यापाऱ्यांनी सुमारे १०० टक्के प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली.