Ticker

6/recent/ticker-posts

शितोळे-देशमुख की शितोळे पाटील? पाटसमध्ये कोणाचे 'घड्याळ' टिक-टिक करणार?



संघर्षात थोरातांकडे 'जोरदार फिल्डिंग'!

पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

पाटस : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून प्रतिष्ठेच्या पाटस-कुरकुंभ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षांतर्गत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या गटात आता शितोळे-देशमुख आणि शितोळे-पाटील या दोन प्रभावी गटांनी आपापल्या उमेदवारांचे पोस्टर्स झळकावत उमेदवारीवर दावा ठोकल्याने एकाच पक्षातील अंतर्गत रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन शितोळे-देशमुख यांच्या पत्नी सौ. आशा नितीन शितोळे-देशमुख यांच्या समर्थकांनी "फिक्स जिल्हा परिषद सदस्य" अशा घोषणांचे पोस्टर्स लावून सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड व ग्रामपंचायत सदस्य सागरदादा वसंतराव शितोळे-पाटील यांनीही आपल्या वहिनी सौ. पुनमताई सुशील शितोळे-पाटील यांच्यासाठी मैदानात शड्डू ठोकला असून त्यांनीही "४७ पाटस जिल्हा परिषद गट फिक्स सदस्या" असा दावा केला आहे. या दोन्ही गटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि पक्षाच्या 'घड्याळ' चिन्हाचा वापर करत आपणच संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत. एकाच पक्षातील आणि एकाच कुटुंबातील दोन प्रबळ गट एकाच जागेसाठी आग्रही असल्याने माजी आमदार रमेश थोरात यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला असून, दोन्ही नेत्यांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी थोरातांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. आता या शितोळे विरुद्ध शितोळे संघर्षात रमेश थोरात कोणाच्या पारड्यात माप टाकतात आणि पाटसमध्ये नेमके कोणाचे घड्याळ टिक-टिक करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.