बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यात कांदा, गहू, ज्वारी या रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसत आहे. यंदा अती पावसाने आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता पुन्हा या बदलत्या वातावरणाने चिंता वाढवली आहे.
सततच्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने पुसेगाव, विसापूर, खातगुण, जाखणगाव, खटाव, निढळ, बुध, राजापूर, डिस्कळ, मोळ, ललगुण, नेर, वर्धनगड या परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील वाढीस लागलेले कांद्याचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना औषधींची फवारणी करावी लागत आहे. तर परिसरातील काही शेतकरी नुकतेच लागण केलेल्या कोवळ्या पिकावरच फवारणी करत आहेत.
यंदा पावसाचा कालावधी लांबल्याने शेतातील खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी शेतातील खरिपाची सुगी उरकून कशीबशी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आणि लागवड केली आहे. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आशा पल्लवीत होत असताना ढगाळ वातावरणामुळे पिके माना टाकायला लागली आहेत. त्यामुळे पिके जोमात आणण्यासाठी शेतकरी औषध फवारणी, जादाची खते यासारखे विविध उपाय करत आहेत. मात्र, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
दरम्यान, डिसेंबरपासून पडलेली कडाक्याची थंडी कांदा, बटाटा, गहू, हरभरा व इतर पिकांना पोषक ठरत असताना अचानक ढगाळ वातावरण तयार होत असल्याने हवेतील थंडीचे प्रमाण कमी होत आहे. तर कधी ऊन तर कधी तयार होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे रब्बीची पिके पिवळी पडून रोगाला बळी पडत असल्याचे चित्र आहे.
ढगाळ वातावरणामुळे फारशी थंडी पडत नसल्यामुळे रब्बी हंगामातील लागवड झालेल्या पिकांना निसर्गाचा कोणताही फायदा होत नाही. या प्रतिकुल हवामानामुळे कांदा, गहू, हरभरा आदींसह रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.-विशाल फडतरे, प्रगतशील शेतकरी, फडतरवाडी (बुध).





Social Plugin