Ticker

6/recent/ticker-posts

वरिष्ठांचा आदेश डावलल्याने कुसेगावची संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त; ९ सदस्यांचे पद रद्द


पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

कुसेगाव:दौंड तालुक्यातील कुसेगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यकारिणीवर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आणि नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याच्या ठपक्यावरून विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुसेगाव ग्रामपंचायत कार्यालय आणि त्यावरील बाजारगाळे इमारतीचे बांधकाम करताना प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील तरतुदींचे पालन करण्यात आले नसल्याची तक्रार माजी सरपंच मनोज वसंत फडतरे यांनी केली होती. या बांधकामामुळे अष्टविनायक महामार्गावर अतिक्रमण झाल्याचा आणि शासकीय सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. सदर अर्जाची दखल घेऊन गट विकास अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी केली असता, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले.

​या चौकशी अहवालाच्या आधारे पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार सरपंच श्रीमती छाया मोहन शितोळे, उपसरपंच डॉ. अमोल गणेश शितोळे यांच्यासह इतर सात सदस्यांना उर्वरित कालावधीसाठी पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे कुसेगाव ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त झाली असून परिसरात या कारवाईची मोठी चर्चा होत आहे.