शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विलास खंडाईत लवकरच सातारा येथे ' राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अधिवेशन ' होणार
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
शासन दररोज नवीन फतवा काढून नको त्या कामात गुंतवत शिक्षकांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेपासून दूर करत आहे. त्यामुळे मुलांच्या गुणवत्ता वाढीत बाधा निर्माण होऊन भावी पिढी असंस्कारक्षम निर्माण होण्याची भीती समाजात वाढत आहे.असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांची, संघटनेच्या माध्यमातून एकजूट होणे गरजेचे असल्याचे सांगून लवकरच संघटनेच्या वतीने सातारा येथे राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अधिवेशन आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विलास खंडाईत यांनी स्पष्ट केले.
वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झालेल्या खटाव व माण तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष प्रा दशरथ जाधव, उपाध्यक्ष प्रा सुनिल शिंदे प्रा प्रमोद राऊत, प्रा के बी जाधव,प्रा नाना सजगणे,प्रा सौ सुवर्णा कोळी, यांच्यासह दोन्ही तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ खंडाईत म्हणाले, सध्या चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरी ही इ ११ वी ची प्रवेश प्रक्रिया शासन आदेशाने अद्याप सुरू आहे. एक दोन महिन्यात कानावर पडलेल्या अभ्यासाच्या आधारे नवीन प्रवेशित विद्यार्थी वार्षिक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सक्षम राहतील का? अपयशाने खचल्यास ती जबाबदारी कोणाची? एक पिढी बरबाद करण्याचा नैतिक अधिकार शासनाला आहे का? दररोज नवीन फतवा काढून शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. तातडीने माहिती पाठवण्याच्या कामात व्यस्त झालेला शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकत नाही, पर्यायाने मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? नव्याने शिक्षक भरती होत आहे मात्र पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षक भरती करताना ज्या त्या जिल्ह्यातील शिक्षकांनाच समाविष्ट करावे अशी संघटनेची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लवकरच इ १२ वी बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत, तुटपुंज्या मानधनावर प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकांच्यावर तसेच शैक्षणिक जबाबदारीची जाणीव असलेल्या शिक्षणसंस्था चालकांच्यावर शासन अविश्वास दाखवत आहे.परीक्षे दरम्यान या महाविद्यालयातील शिक्षक दुसऱ्या महाविद्यालयातील मुलांच्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार! त्यामुळे काय आणि किती प्रकारच्या अडचणींचा सामना संबंधित शिक्षक पर्यवेक्षक तसेच परीक्षा दालनात मुलांच्या मानसिकतेवर पेपर लिहताना काय परिणाम होतोय याची जाणीव वरच्या अधिकाऱ्यांना आहे का? त्यामुळे परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षणाचे काम करण्यास संघटनेचा ठाम विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. अद्याप ही प्रलंबित असलेले अनेक प्रकारचे शिक्षकांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी शासन दरबारी वेळप्रसंगी आक्रमक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लवकरच संघटनेच्या वतीने आपल्या जिल्ह्यात राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना अधिवेशन आयोजित करून निमंत्रित केलेल्या शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक , शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी त्यांच्या समोर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रश्न एकजूटीने मांडणार आहे, अनुदानित, विनाअनुदानित सी एच बी, संस्था स्तरावर नियुक्त, स्वयंअर्थ सहाय्यित या शिक्षकांच्या सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन डॉ विलास खंडाईत यांनी दिले.
यावेळी खटाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदी प्रा पंकज घनवट, उपाध्यक्ष प्रा दिलीप बरकडे , सचिव पदी प्रा संदीप तिवाटणे तर माण तालुका अध्यक्ष पदी प्रा समाधान राऊत उपाध्यक्ष प्रा विजया शिंदे तर सचिव पदी प्रा चंद्रकांत गायकवाड यांची सर्वानुमते निवड झाली.





Social Plugin