२५ महिलांचा दहावी परीक्षेचा ऐतिहासिक निर्णय
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
“लहान गाव, मोठा संदेश” – हा घोषवाक्य फक्त वाक्यांपुरता मर्यादित नाही, तर माण तालुक्यातील कासारवाडी गावातील २५ महिलांनी एकाच वेळी दहावीची परीक्षा देण्याचा ऐतिहासिक निर्णय याचा सर्वोत्तम पुरावा आहे. ग्रामीण महाराष्ट्रात महिलांचे शिक्षण अजूनही अनेकदा आकडेवारीपुरते राहते, पण कासारवाडीने दाखवले की इच्छाशक्ती, प्रशासनाचा पाठबळ आणि समाजाचा पाठिंबा असला की बदल अगदी लहान गावातही घडू शकतो.
कासारवाडी हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक अतिशय छोटं गाव आहे. येथे एकूण लोकसंख्या ८७३ असून, पुरुष ४३१ आणि महिला ४४२ आहेत. गावातील १६१ कुटुंबांमध्ये शिक्षण, सामाजिक आणि ग्राम विकासाच्या प्रगतीला महत्त्व दिले जाते. या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी अलीकडे राज्यातल्या लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गावाचा नाव रोषण केले आहे. यशस्वी विद्यार्थिनींच्या, त्यांच्या शिक्षकांचे तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी डिसेंबर महिन्यात सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशनी नागराजन यांनी नुकतीच कासारवाडी भेटीस आल्या होत्या.
सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशनी नागराजन यांनी गुणगौरव कार्यक्रमात कासारवाडीतील सर्व महिलांना प्रश्न विचारला, “यामधील किती महिलांचे शिक्षण दहावीच्या पुढे झाले आहे?” काही महिलांनी सांगितले की त्यांनी दहावीमध्ये अपयश भोगले आहे. यावर सीईओ याशनी नागराजन यांनी महिलांना आवाहन केले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत “आपण यंदा दहावीची परीक्षा देऊयात.” या आवाहनाला उपस्थित महिलांनी सकारात्मकतेने प्रतिसाद दिला.
या निर्णयाची माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे व गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांनी अंमलबजावणी करत तांत्रिक अडचणीही समोर आल्या. पाहिले तर काय दहावीच्या परीक्षा फॉर्म भरायची मुदत ऑगस्ट २०२५ मध्ये संपली होती. त्यामुळे काहीशा अडचणी निर्माण झाल्या. परंतु प्रदीप शेंडगे व लक्ष्मणराव पिसे यांनी अधिक माहिती घेतली असता लेट फी भरून अर्ज भरता येऊ शकतात अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मदतीने कासारवाडीतील सर्व महिलांचे सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात २५ विवाहित महिला ह्या दहावी नापास असल्याचे आढळून आले. त्यानंतर लेट फी भरून १७ नंबरचा फॉर्म भरण्याची व्यवस्था केली. प्रत्येक महिलेसाठी खर्चाची गणना अशी होती – लेट फी २८९० रु, फॉर्म फी १००० रु, प्रतिज्ञापत्र २०० रु, म्हणजे एकूण ४०९० रु. २५ महिलांसाठी हा खर्च १,०२,२५० रुपये झाला, ज्यामध्ये ५०% पंचायत समितीच्या सेस फंडातून तर उर्वरित ५०% लोकसहभागातून गोळा केला गेला. लोकसहभागामध्ये सरपंच छाया सस्ते यांनी २० हजारांचे योगदान दिले.
सर्व २५ महिला विवाहित असल्यामुळे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, प्रतिज्ञापत्र सादर करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधणे हे मोठे आव्हान होते. तरीही प्रशासनाने नियोजनपूर्वक सर्व प्रक्रिया पार पाडल्या आणि महिलांना परीक्षेस बसवण्यात यश मिळाले.
ही घटना फक्त शैक्षणिक यश नाही, तर स्त्रीशक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरक उदाहरण आहे. ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणापासून दूर ठेवणारी कारणे अनेक आहेत. घरगुती जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी, सामाजिक बंधने. पण कासारवाडीतील विवाहित महिलांनी दाखवले की, इच्छाशक्ती असल्यास कोणतीही अडचण शिकण्याच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही.
..... मुख्य कोट...
शिक्षणामुळे महिलांना आत्मनिर्भर बनण्याची संधी : सीईओ
कासारवाडीतील शैक्षणिक उपक्रमाचे महत्त्व केवळ त्या गावापुरते मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते. लहान गावातही शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवता येतो, आणि महिलांना सशक्त बनवता येते, हे या उदाहरणातून स्पष्ट होते. कासारवाडीने हे दाखवले की लहान गावांतील स्वप्नंही राज्यासाठी दिशादर्शक ठरू शकतात आणि त्यातून समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो. भविष्यकाळात कासारवाडी गाव हे राज्याच्या आदर्श मॉडेलमध्ये आपणाला लवकरच दिसेल.
याशनी नागराजन सीईओ, जिल्हा परिषद सातारा (कोट मध्ये फोटो वापरणे)
.....कोट.....
सीईओंच्या
मार्गदर्शनामुळे कासरवाडीची विकासात्मक वाटचाल : सरपंच
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवाडीतील २५ विवाहित महिलांनी दहावीची परीक्षा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सध्या त्या सर्व महिला आपल्या घरी नियमित अभ्यास करत आहेत. त्यांना मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मदत करत आहेत. हा निर्णय केवळ शैक्षणिक नाही, तर सामाजिक आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीनाही गावासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कासारवाडीमध्ये ग्रामविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे ग्रामस्थ एकजुटीने राबवते.
छाया सस्ते सरपंच कासारवाडी (कोट मध्ये फोटो वापरणे)
.....चौकट.....
कासारवाडीचे धाडसी पाऊल महाराष्ट्राला दिशादर्शक
कासारवाडी गावात स्त्री जन्मदर सुद्धा चांगला आहे. येथे शिक्षणाला अधिक महत्त्व देऊन काम केले जाते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी राज्याच्या लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावतात तर एकाच वेळी गावातील २५ विवाहित महिला दहावीच्या परीक्षेत बसण्याचा इतिहास गावात निर्माण करतात, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने दिशादर्शक आणि आदर्श असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.
छायाचित्र - कासारवाडीतील शैक्षणिक धाडस करणाऱ्या २५ महिलांसोबत ऐतिहासिक क्षण साजरा करताना सीईओ याशनी नागराजन व सरपंच छाया सस्ते.







Social Plugin