बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत परिसरात साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय व नियोजनबद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम, माती व पाण्याचे प्रदूषण तसेच मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात आला.
या मोहिमेत रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसरात, व वसाहतींमध्ये जमा झालेला एकदाच वापरता येणारा प्लास्टिक कचरा वेगळा करून संकलित करण्यात आला. संकलित कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिकची सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
प्लास्टिकचा अतिवापर टाळणे, कापडी पिशव्यांचा वापर वाढवणे, कचरा ओला व सुका असा वेगळा ठेवणे आणि पुनर्वापराची सवय लावणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. “आज प्लास्टिक सोयीचे वाटते; मात्र उद्याचे पर्यावरण धोक्यात टाकते,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमात वेटणे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य,स्थानिक नागरिक राष्ट्रीय सेवा योजना , विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्वच्छता मोहिमेसोबतच जनजागृती फेरी, घोषवाक्ये व माहितीपत्रकांच्या माध्यमातून लोकांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्यात आली... प्लास्टिकमुक्त परिसर घडवण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे केवळ परिसर स्वच्छ होत नाही, तर भावी पिढीसाठी सुरक्षित व संतुलित पर्यावरण निर्माण होण्यास मोठी मदत होते, कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.के.जी.कुंभार.आणि प्रा.डाॅ.एच.जी.निमसे तसेच प्रा.डाॅ.एन.डी.लोखंडे,प्रा.आर.के. मुल्ला प्रा.एस.डी.वाघमारे शिबिरातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.





Social Plugin