सतीश पांडे (कळमेश्वर प्रतिनिधी)
कळमेश्वर :- नागपूर–काटोल महामार्गावरील सर्व्हिस रोड व पुलाचा मुद्दा ऐरणीवर आला असून त्यामुळे दहेगाव येथे नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. या ग्राम सभेमध्ये गावात आतापर्यंत झालेली विकासकामे, तसेच भविष्यात होणाऱ्या प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्राम सभेतील सर्वात महत्त्वाचा व ज्वलंत विषय म्हणजे नागपूर–काटोल महामार्गावर दहेगाव हद्दीतील सर्व्हिस रोड व पुलाचे काम हा होता. सदर महामार्गावर सर्व्हिस रोड व पूल नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अपघातांचा धोका देखील वाढलेला आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रश्नाच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी सर्व ग्राम वासीयांच्या वतीने लवकरात लवकर माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना निवेदन देण्याचा ठराव सर्वाचे मते मंजूर करण्यात आला.
तसेच, दहेगाव हद्दीतील पूल व सर्व्हिस रोडचे काम तातडीने मंजूर होऊन प्रत्यक्षात सुरू व्हावे, यासाठी प्रसंगी दहेगाव ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सज्ज राहतील, असा ठाम निर्धार ग्रामसभेत व्यक्त करण्यात आला.
ग्रामस्थांनी एकत्र येत गावाच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी आवाज उठवण्याचा निर्धार केल्याने आगामी काळात या विषयावर निर्णायक लढा उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मीटिंग ला श्री मंगेश गमे शिवसेना जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख, श्री मधुकर मानकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष , श्री भीमराव इंगळे माजी उपसरपंच, सुमित गमे दक्षता समिती सदस्य, दूंडेश्वर धोटे माजी उपसरपंच , अमित मानकर, हिमांशु धोटे, व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.





Social Plugin