Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समिती पाटणमधील कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात रासप पाटण तालुकाध्यक्ष विकास कदम यांचा उपोषणाचा इशारा.



७ दिवसांत कार्यवाही न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा**

पाटण (दिनकर वाईकर) 

पंचायत समिती पाटण येथील विविध विभागांमध्ये कामचुकारपणा वाढल्याचा आरोप करत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अध्यक्ष विकास कदम यांनी पंचायत समिती प्रशासनाला लेखी निवेदन देत ही कारवाई करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पंचायत समिती पाटण अंतर्गत पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, बांधकाम उपविभाग, पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन विभाग तसेच इतर विभागांतील काही अधिकारी व कर्मचारी सातत्याने कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाहीत. अनेक वेळा उशिरा येणे, कार्यालयीन कामाकडे दुर्लक्ष करणे तसेच दुपारी किंवा वेळेपूर्वीच कार्यालय बंद करून घरी जाणे असे प्रकार नियमितपणे घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसून शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात विलंब होत आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत यापूर्वी तोंडी तक्रारी करण्यात आल्या असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात चार प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या असून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करावे, कामचुकार व वेळेपूर्वी कार्यालय सोडणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, हजेरी व तपासणी यंत्रणा प्रभावीपणे राबवावी तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांवर ७ दिवसांच्या आत योग्य निर्णय व कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्ष पाटण तालुका अध्यक्ष विकास कदम यांनी दिला आहे. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अंध्यक्ष (विकास  कदम अंध्यक्ष )