संतोष फुलारी @भेंडा ग्रामीण प्रतिनिधि
दि.7 जानेवारी 2026:
नेवासा तालुक्यातील पत्रकारितेला बळ देणाऱ्या दैनंदिन पत्रकारांच्या कार्याचा गौरव म्हणून नागेबाबा ग्रामीण पतसंस्था, भेंडा शाखेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजव्यवस्थेचा एक महत्त्वाचा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे योगदान अधोरेखित करत या कार्यक्रमात तालुक्यातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेबाबा पतसंस्थेचे माजी संचालक गणपत राव गव्हाणे होते. प्रस्ताविक राजेंद्र चिघे यांनी केले. सूत्रसंचालन नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक दिल्लदार शेख यांनी केले. तर नागेबाबा मल्टीस्टेटचे शाखा व्यवस्थापक संतोष सापते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी बोलताना प्रा. संतोष सोनवणे म्हणाले की, “राज्यभर पत्रकारांचा सन्मान करणारी नागेबाबा ही एकमेव संस्था आहे. दैनंदिन पत्रकारांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत.”
तर पत्रकार कारभारी गरड यांनी, “कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेबाबा पतसंस्था दरवर्षी पत्रकार सन्मानाचा उपक्रम राबवते. पत्रकारिता हे सावित्रीचे वाण आहे. पत्रकारांना अडचणीत आणणारे खूप लोक असतात; मात्र अडचणीच्या काळात समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सन्मान सोहळ्यात भेंडा परिसरातील पत्रकार सुखदेव फुलारी, कारभारी गरड, बाळकृष्ण पुरोहित, नामदेव शिंदे, रमेश पाडळे, संतोष सोनवणे, अशोक पंडित, संतोष ओताडे, संतोष फुलारी, युसुफ सय्यद, अशोक पेहरकर आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांनी पत्रकार हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा समाजाचा सजग घटक असल्याचे मत व्यक्त केले. नेवासा तालुक्यातील पत्रकारितेला दैनंदिन पत्रकार मुकुंदराव पाटील यांच्या विचारांचा वारसा लाभलेला असून तो पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पत्रकारांवर असल्याचे प्रतिपादन गणेश महाराज चौधरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागेबाबा पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व परिसरातील मान्यवरांचे सहकार्य लाभले.
.jpg)




Social Plugin